बदलत्या काळात लग्नासाठी लाखोंची उलाढाल

शेरखान शेख 

सामुदायिक विवाह सोहळ्यांची चळवळ दुर्मिळ


कर्ज काढून समाजात विनाकारण ‘बडेजाव’

शिक्रापूर- वधू-वराच्या लगीनघाईत सोन्याच्या वाढत्या बाजार भावाने वधू-वर पक्षाची धावपळ उडाली असून लग्न थाटात करताना मोठा आर्थिक बोजा वाढला असून अनेकांनी आपली हौस-मौज करण्यासाठी एक ते पाच ग्रॅमच्या सोन्याच्या दागिन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरू असून लग्नकार्य मोठ्या थाटात करून द्यावे, असा आग्रह अनेक वर पक्षाकडून केला जातो. बदलत्या कार्यक्रम पद्धतीत हुंडा संस्कृती काहीशी बंद होत चालली आहे.

आता हुंडा नको; परंतु लग्न चांगले करुन द्या, जमलं तर तुमच्या मुलीला दागिने करा, असे म्हणत आजही अनेक विवाह ग्रामीण भागात साजरे होत आहे. आपल्या मुला मुलींचे लग्न चांगले व्हावे, यासाठी मोठा खर्च केला जातो. यात कपडे, संसार उपयोगी वस्तू, गाड्या, वाजंत्री, मांडव, कार्यालय व जेवण, लग्नपत्रिका यावर वधू पक्षाचा मोठा खर्च होत असतो. त्याच तुलनेत वरपक्ष देखील काही खर्च करतो. गेल्या पाच वर्षांत वाढत्या महागाईने लग्नकार्य करताना अनेक सर्व सामान्य कुटुंब कर्जबाजारी होतात.

यातच गेल्या काही वर्षात सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील पाच वर्षांच्या तुलनेत 22 ते 23 हजार एका तोळ्याचा बाजारभाव 30 ते 32 हजारांवर गेला आहे. हाच बाजारभाव नऊ ते दहा वर्षापूर्वी 12 ते 15 हजार होता. तर 15 वर्षांपूर्वी पाच ते सहा हजार रुपये एका तोळे सोने घेण्यासाठी लागत होते. त्यावेळी एक दोन ग्रॅमचे दागिने काहीसे मिळत नव्हते; परंतु बदलत्या बाजारपेठा व नवनवीन कमी किमतीच्या तरीही भरगच्च डिझाईन व आकाराने मोठे दिसणारे सोन्याची पॉलिश असलेले दागिने बाजारपेठेत मिळत आहेत. लग्नकार्यात या दागिन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. सोन्याच्या वाढत्या बाजारभावाने सर्वसामान्य नागरिक या दागिन्याकडे मोठ्या प्रमाणात वळाले आहे.

ग्रामीण भागात एका लग्न समारंभाचा कमीत कमी व जास्तीत जास्त खर्च
2000-05  – एक ते चार लाख
2005-10 – दोन ते आठ लाख
2010-14 – पाच ते पंचवीस लाख
2014-18-  पाच लाख ते चाळीस लाख

वाढत्या महागाईत लग्नाचा कमीत कमी व जास्तीत जास्त खर्च
कपडे – 50 हजार ते दहा लाख
जेवण – 30 हजार ते पंधरा लाख
वाजंत्री – 20 हजार ते तीन लाख
मंगल कार्यालय – 40 हजार ते दहा लाख
संसारोपयोगी वस्तू – 10 हजार ते आठ लाख
दागिने – 60 हजार ते पंधरा लाख
वरात, मिरवणूक – 30 हजार ते तीन लाख
इतर खर्च – 30 हजार ते तीन लाख

 सामुदायिक विवाह सोहळे प्रेरणादायी
आजही काही तालुक्‍यांत अनेक ठिकाणी होणारे सामुदायिक विवाह सोहळे होत असतात. तुलनेने ही संख्या घटली असनू, ही चळवळही मागे पडत चालली आहे. मा अशी चळवळ नक्कीच प्रेरणादायी आहे. अनेक गरीब कुटुंब याकडे वळत असून मोठ्या प्रमाणात होणारा खर्च वाचत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना असे सोहळे दिलासा देणारे ठरत आहेत. तरीदेखील आजही वाढत्या महागाईत परंपरा जपण्यासाठी अनेक नागरिक होणारा मोठा खर्च कर्ज काढून करीत आहेत.

मंगल कार्यालयातच लग्नाचा आग्रह
घरासमोर मांडव टाकून होणारी लग्न दुर्मिळ झाली असून कार्यालयांकडे मोठा कल गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. शिरूर, आंबेगाव, खेड, हवेली भागात मोठ्या संख्येने मंगल कार्यालये उभी राहिली आहेत. प्रत्येक तालुक्‍यात साधारण 25 ते 30 मोठी मंगल कार्यालये असून अनेक गावांत किमान एक मंगल कार्यालय गेल्या पाच वर्षांत झाले आहे. लाखो रुपये खर्च करून अनेकांनी हे उभे केले असून सध्या त्यांना सोन्याचा भाव आला आहे. एका कार्यासाठी कमीत कमी तीस हजार ते जास्तीत जास्त दहा लाख रुपये भाडे या मंगल कार्यालयांना असून विविध आधुनिक सुविधा, डेकोरेशन, आकर्षक विद्युत रोषणाईने अनेक लग्नकार्य पार पडत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)