बचेंद्री पाल

पर्वतांनी वेढलेल्या उत्तरांचल राज्यात उत्तरकाशीत गढवालमध्ये एक निसर्गसुंदर छोटंस गाव आहे “नाकुरी’ ह्या नाकुरी गावात 24 मे 1954 रोजी एका खेडवळ कामकरी घरात एका कन्येचा जन्म झाला तीच “बचेंद्री पाल’.

उत्तर प्रदेश भारतातील सर्व राज्यांमध्ये सगळ्यात मोठे असलेले राज्य क्षेत्रफळ व लोकसंख्या दोन्ही दृष्टीने, प्रशासकीय सोईसाठी सन 2000 साली उत्तर प्रदेशातील उत्तर पूर्वेकडील लहानसा भाग उत्तराखंड नावाने वेगळा करण्यात आला. हे भारताचे 27 वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. या राज्यांची लोकसंख्या सुमारे 1 कोटी आणि क्षेत्रफळ 55000 स्क्‍वेअर किलोमीटर. राज्याचा 64 टक्के भाग जंगलांनी व्यापलेला, उरलेल्या सखल भागाला तराई असे नाव. हे राज्य जणू हिमालयाच्या कुशीतच वसलेले आहे. राज्याच्या डाव्या सीमेलगत हिमाचल व उत्तर प्रदेश ही राज्ये तर उजव्या सीमेवर उत्तरेकडे तिबेट तर दक्षिणेस नेपाळ.

राज्याचे नैसर्गिक सौंदर्य अपूर्वच म्हणावे असे. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, सुंदर नैसर्गिक तलाव आणि उंच वृक्षराजी, जणू देवभूमीच, राज्याचे हरिद्वार, गढवाल, उत्तरकाशी, डेहराडून, नैनिताल, रूद्रप्रयाग इत्यादी 13 जिल्हे आणि प्रत्येक जिल्हा आपापल्या प्रकारे प्रसिद्ध, जसे हरिद्वार तीर्थक्षेत्र, गढवाल चारधाम यात्रा, मसुरी नैनिताल सर्वात सुंदर थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रख्यात आहेत. राज्यातून दिसणारी गंगोत्रीसारखी हिमालयाची शिखर पर्यटकांना साद घालणारी. डेहराडूनही राज्याची राजधानी. ह्या नावाचा अर्थ डेहरा- डून म्हणजे द्रोणाचा डेरा (तंबू, ठिकाण) म्हणजे द्रोणाचार्यांचे ठिकाण असा होतो. नेपाळ व तिबेट असे दोन देश ह्या राज्याच्या पूर्व सीमेलगत असल्याने हिमालयाच्या उंच शिखराचं सान्निध्य ह्या राज्याला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगाधिराज एव्हरेस्ट – हा तर नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर आहे. याच्या नावाची एक वेगळीच कहाणी आहे. नेपाळमध्ये याला “सागरमाथा’ नाव आहे तर चीन (तिबेट) मध्ये वेगळेच मुळात ह्या भागातील पर्वत शिखरांना पूर्वी नावेच नव्हती. एव्हरेस्टचं पूर्वीचे नाव “शिखर 15′ असं होतं.

सन 1830 ते 1843 या काळात सर जॉर्ज एव्हरेस्ट नावाचे ब्रिटिश अधिकारी भारताचे सर्व्हेअर जनरल होते. त्यांच्या पश्‍चात 1852 साली “सर्व्हे ऑफ इंडिया’या खात्याची स्थापना झाली. कालांतराने 1865 साली “शिखर 15’ला माऊंट एव्हरेस्ट असे नाव देण्यात आले. एव्हरेस्टला पृथ्वीवरचे सर्वात उंच शिखर मानले जाते.

पर्वतांनी वेढलेल्या उत्तरांचल राज्यात उत्तरकाशीत गढवाल मध्ये एक निसर्गसुंदर छोटसं गाव आहे “नाकुरी’ ह्या नाकुरी गावात 24 मे 1954 रोजी एका खेडवळ कामकरी घरात एका कन्येचा जन्म झाला तीच “बचेंद्री पाल’. बचेंद्रीचे वडील किशनसिंग पाल व आई हंसा देवी. ह्या दांपत्याला बचेंद्रीसह एकूण सात अपत्ये झाली. उपजीविकेसाठी किशनसिंग फिरत्या विक्रेत्याचे काम करत असत. त्यांच्या कामात ते भारतातून तिबेटमध्ये किराणा माल पोहोचविण्याचे काम करीत. बचेंद्री लहानपणापासूनच एक खेळकर, धीट, मनस्वी आणि साहसी मुलगी होती. प्राथमिक शाळेत अभ्यासात आणि खेळांमध्येही तिला चांगलीच गती होती.

बचेंद्री 12 वर्षांची असताना एकदा तिच्या शाळेची सहल डोंगर रांगाजवळ गेली होती. ह्या सहलीतच बचेंद्रीचे जवळ जवळ 4000 मीटर म्हणजेच 13000 फूट उंच शिखर पादाक्रांत केले. तिची गिर्यारोहणाची आवड तिथेच उत्पन्न झाली. बचेंद्रीच्या हुशारीकडे पाहून तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी हिला कॉलेजमध्ये पाठवा असा सल्ला बचेंद्रीच्या वडिलांना दिला.

कॉलेजमध्ये सुद्धा बचेंद्री खेळात भाग घेत असे. तेथेच तिने रायफल शूटिंगमध्येही पदके मिळवली. कॉलेजातच तिने नेहरू इन्स्टिट्यूट ह्या गिर्यारोहण संस्थेचा एक कोर्स केला आणि गंगोत्री व रूद्रगरिया ही हिमालयातील शिखरे ती चढून गेली. बचेंद्री ही तिच्या नाकुरी खेड्यातली पहिलीच पदवीधर महिला ठरली.

बचेंद्रीला हिमालयातील दुर्गम शिखरे साद घालत होती. गिर्यारोहक बनण्याचे तिचे ठाम स्वप्न होते. तर घरी ह्या गोष्टीला सक्‍त विरोध होता. बचेंद्रीने शिक्षिका व्हावे असे आईवडिलांचे मत होते. डेहराडूनच्या डी ए व्ही पदव्युत्तर कॉलेजमधून बचेंद्री संस्कृत विषय घेऊन एम.ए. झाली तर तिने बी.एड ही पदवीसुद्धा मिळवली. मात्र शिक्षिकेची नोकरी स्वीकारता तिने “नॅशनल ऍडव्हेंचर फाऊंडेशन’ ह्या संस्थेत नोकरी करणे पसंद केले.

सहा भारतीय महिला आणि 11 पुरुष समाविष्ट असलेल्या एका विशेष गिर्यारोहण मोहिमेत तिची निवड झाली. हा गिर्यारोहकांचा गट नेपाळमधून सागरमाथा हा शिखरावर चढाई करणार होता. हे साल होते 1984. 22 मे 84 रोजी नेपाळमधून अंग दोरजी व इतर गिर्यारोहक या गटात सामील झाले. चढाई सकाळी कॅम्प 9 पासून सुरू झाली. ह्या चढाईत मोठाल्या हिमवादळांना तोंड देण्याचा प्रसंगी त्यांच्यावर आला. ह्या वादळात त्यांचा कॅम्प गाडला गेला. निम्म्याहून अधिक लोक जायबंदी झाले. त्यामुळे या पथकातील काही गिर्यारोहकांनी माघार घेतली. परंतु डगमगून न जाता पुृढे वाटचाल करणाऱ्या मंडळींबरोबर जाण्याचे बचेंद्रीने ठरविले. पथकातील मंडळीसोबत चढणारी बचेंद्री ही आता एकच महिला उरली होती. 23 मे 1984 रोजी दुपारी 1 वाजून 07 मिनिटांनी अखंड 30 तासांच्या परिश्रमानंतर हे पथक शिखर सागरमाथा म्हणजेच एव्हरेस्ट या शिखरावर पोहोचले. शिखरावर भारताचा ध्वज फडकला आणि बचेंद्री ही एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी पहिली भारतीय महिला ठरली. बचेंद्रीच्या साहसी मोहिमा चालूच होत्या. ह्या मोहिमातून भारतीय गिर्यारोहक महिलांचे गिर्यारोहणाचे व रिव्हर राफ्टिंगचे प्रशिक्षणही बचेंद्रीने केले.

सन 1985 मध्ये भारतीय व नेपाळी महिलांचा एव्हरेस्ट चढणारा संघ तिच्या नेतृत्वामुळे मोहीम पुरी करू शकला. ह्या चमूने 7 जागतिक उपक्रम केले व ही मोहीम भारतीय गिर्यारोहणातील मानदंड ठरली. सन 1993 साली भारत-नेपाळ महिला गिर्यारोहकांची मोहीम स्वत: आखून यशस्वी केली.

सन 1994 साली हरिद्वारपासून निघून कोलकातापर्यंत जाणारी महिलांची गंगा रिव्हर राफ्टींग मोहीम यशस्वीपणे पार पडली. (अंतर 2500 कि.मी.) तर सन 1997 मध्ये हिमालय पर्वत ओलांडून जाणारी महिलांची सफर आयोजित केली. हे अंतर एकूण 4500 कि.मी. होते. ही मोहीम अरुणाचल प्रदेशात सुरू झाली. ती सियाचीन हिमनदीपाशी संपली. (ग्लेशियर)

आज आपल्याला शालेय आदिवासी (चंद्रपूर) व 14 वर्षीय महिला ही एव्हरेस्ट मोहीम करताना दिसत आहेत. बचेंद्रींचे नेतृत्वगुण, साहस, धडाडी, चिकाटी हे गुण पाहून “टाटा स्टिल अॅडव्हेंचर फाऊंडेशन’ ने बचेंद्रीला 1984 मध्ये नोकरी दिली.

उद्योग जगतातील कामगारांसाठी उंच प्रदेशात वास्तव्य करणे व काम करणे ह्यासाठी लागणारे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी बचेंद्रीवर सोपविण्यात आली. व्यवस्थापकांच्या संघभावना कशी वाढवावी, एखाद्या अतिशय कठीण प्रसंगी मनोधैर्य राखून सफलतेने वाटचाल कशी करावी याचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा बचेंद्रीकडेच सोपविण्यात आली. “टाटा स्टील अॅडव्हेंचर फाऊंडेशन’च्या प्रमुख अधिकारपदाची जागा बचेंद्रींने भूषविली. नोकरी चालू असताना बचेंद्रीचे समाजकार्य चालू होते. सन 2013 मध्ये उत्तर भारतात मोठ मोठे पूर आले. उत्तरकाशीमधील अति उंचावरील गावामधून पूरस्थिती बिकट झाली. ह्या गावांमधील लोकांना मदत पोहचविणे व अडकलेल्या लोकांची सुटका करणे हे काम सैन्यदलातील जवानांनासुद्धा अवघड जाऊ लागले. अशा वेळी बचेंद्रीच्या संघातील स्त्रियांनी दुर्गम भागात जाऊन पूरग्रस्तांना मदत केली.

निवृत्तीनंतरही बचेंद्रीचा गिर्यारोहण, रिव्हर राफ्टिंग व समाजसेवा यात सक्रीय सहभाग आहे. विमेन ऍडव्हेंचर नेटवर्क ऑफ इंडिया (थअछख) ह्या संस्थेची अध्यक्ष म्हणून ती काम करत आहे.

– वीणा गोरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)