बचतगट चळवळीशी जोडली गेली 40 लाख कुटुंबे – पंकजा मुंडे

मुंबई: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, ५० लाख रुपयांच्या उलाढालीपासून सुरु झालेली महालक्ष्मी सरस प्रदर्शनाची चळवळ मागील वर्षी १० कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोहोचली आहे. यावर्षीही या प्रदर्शनातून बचतगट मोठी आर्थिक उलाढाल करतील. या प्रदर्शनात दुष्काळी भागातील नापिकीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबातील महिलाही सहभागी झाल्या आहेत. आपल्या उत्पादनांची विक्री करुन त्या आपले कुटुंब सावरत आहेत. महिला बचतगटांच्या अशा लाखो यशोगाथा आहेत. महिलांनी बचतगट चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला क्रांतिकारी गती दिली आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

बचतगटांच्या ‘उमेद’ अभियानात राज्यात पूर्वी फक्त ८ जिल्ह्यांचा समावेश होता. मागील चार वर्षात राज्यातील २६ जिल्ह्यांचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये ‘उमेद’ अभियानांतर्गत साडेतीन लाख बचतगट काम करीत आहेत. ४० लाख कुटुंबे या अभियानाशी जोडली गेली असून त्यापैकी ८लाख कुटुंबांना प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. या कुटुंबातील महिला आता लघुउद्योजिका बनल्या आहेत, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘यलो रिव्होल्युशन’चाही प्रारंभ

राज्यात ज्याप्रमाणे सहकारी दूध संस्थांमार्फत शेतकऱ्यांचे दूध संकलन करुन त्याला शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाते त्याच धर्तीवर ग्रामीण भागात कुक्कुटपालन करणाऱ्या महिला बचतगटांकडून उत्पादित होणाऱ्या अंड्यांचे संकलन करुन त्यांना आता शहरी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासाठीच्या अभियानाचाही आजच्या कार्यक्रमात प्रारंभ करण्यात आला. राज्यात झालेल्या हरित क्रांती, धवल क्रांतीसारखी ही पिवळी क्रांती (यलो रिव्होल्युशन) असेल. यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकेल, असा विश्वास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

पहिल्या टप्प्यात पालघर आणि धुळे जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार आहे. यासाठी पथदर्शी प्रकल्पाचा आज प्रारंभ करण्यात आला. या दोन जिल्ह्यातील अनुभव लक्षात घेऊन लवकरच इतर ठिकाणी हा प्रकल्प सुरु करण्यात येईल,असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

अस्मिता फंडामधून बालगृहातील किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन दिले जाणार आहेत. राज्यातील सुमारे ४ हजार मुलींना हे नॅपकिन्स दिले जातील. या मोहिमेचा शुभारंभही आज करण्यात आला. अस्मिता फंडामध्ये आतापर्यंत २२लाख रुपये जमा झाले असून नागरिकांनी या निधीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)