बंदी निर्णयाच्या विरोधातील मायावतींची याचिका फेटाळली

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांच्यावर 48 तासांची प्रचार बंदी लागू केली आहे त्या निर्णयाच्या विरोधात मायावती यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मायावतींच्या बाबतीत निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आम्ही समाधानी आहोत असे नमूद करून त्यांनी ही याचिका अमान्य केली आहे. निवडणूक आयोगाने आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांच्या विरोधात प्रचार बंदीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच निवडणूक आयोग आता जागा झाला आहे अशी टिपण्णीही न्यायालयाने केली आहे. निवडणूक आयोगाने सोमवारी मायावती, योगी अदित्यनाथ, मनेका गांधी या नेत्यांवर विविध कालावधींसाठी प्रचार बंदी लागू केली होती. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावरही 72 तासांची प्रचार बंदी लागू करण्यात आली आहे.

मायावती यांनी आपल्या आव्हान याचिकेत म्हटले होते की निवडणूक आयोगाने दबावाखाली हा निर्णय घेतला असून हा निर्णय घेणारा दिवस हा निवडणूक आयोगाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. भाजपच्या विरोधात मुस्लिम मतांची फाटाफूट होताकामा नये म्हणून मुस्लिमांनी कॉंग्रेसला मतदान न करता समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या आघाडीलाच मतदान करावे असे आवाहन मायावती यांनी उत्तरप्रदेशातील एका संयुक्त प्रचार सभेत केले होते. त्या वक्तव्यावरून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.