बंदी असलेला गुटखाच करतोय करोनाचा प्रसार

जिल्ह्यात खुलेआम मिळतोय गुटखा; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

बुध – करोनाबाबत सर्व जण काळजी घेत असले तरी थुंकीतून वाढणाऱ्या करोना संसर्गाला जिल्ह्यात गुटखा विक्रीतून आमंत्रणच मिळत असल्याचे दिसून येत आहे. याचे कारण आहे जिल्हयात सर्वत्र सहज मिळणारा गुटखा. पोलीसांचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. 

जिल्ह्यात गुटखा व पान मसाल्याची खुलेआमपणे विक्री होत असून प्रशासनाकडून केवळ कारवाईचा फार्स केला जात आहे. या गुटखा विक्रीतून अनेक गुटखा विक्रेते लाखोंची कमाई करत आहेत. प्रशासन सुस्त झाले असून गुटखा विक्रेते मात्र तृप्त झाले आहेत. अनेकांनी आपले मोठे बस्तान बसवले आहे. यासाठी सर्वत्र मोठी आर्थिक देवाण घेवाण होते. परंतु, अनेकदा दबाव आल्यावर एखाद्या किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करुन विषयाला बगल दिली जाते.

अन्न व औषध प्रशासनाने कितीही मोठी धडक कारवाई केली तरी दोन तीन दिवसांनी गुटखा पुन्हा सुरू होत असल्याचे चित्र दिसते. या गुटखा व्यासायिकांनी कायद्याच्या सर्वंच नियमांची पायमल्ली करीत आपला अवैध व्यवसाय सुरू ठेवल्याचे आढळून येत आहे. जिल्हयातील पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने अनेक वेळा या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली तरी सर्वत्र गुटखा विक्री जोरात चाललेली दिसते. राज्य शासनाने गुटख्याच्या विक्रीवर बंदी केली असूनसुद्धा सर्व ठिकाणी गुटखा राजरोसपणे व सहज उपलब्ध आहे.

गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण जास्त असून त्यामुळे करोना विषाणूचा प्रसार होत असल्याची दाट शक्‍यता आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी डॉक्‍टरांसह प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस जीव धोक्‍यात घालून काम करीत आहे. करोनाबाधित रुग्णाच्या थुंकी अथवा नाका- तोंडावाटे बाहेर पडणारा सूक्ष्म द्रव दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात गेल्यास करोनाची लागण होते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. एका दिवसात जिल्हयात आठशे- नऊशे करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यावर शासनाकडून कडक अंमलबजावणी करणे अपेक्षित होते.

परंतु सध्या अवैधरित्या गुटखा विक्रीने समांतर बाजारपेठ निर्माण केली आहे. तर यात कोट्यवधी रुपयाची उलाढाल महिन्याला होत आहे. बाजारपेठेत या व्यवसायात मोठी साखळी आहे. आतापर्यंत अनेक वेळा कारवाया झाल्या. पण कार्यवाही होऊनसुध्दा गुटखा विक्री जोरात सुरू आहे. अशा मुजोर अवैध गुटखा माफियांवर प्रशासनाने कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून यांच्यावर कायद्याची जरब बसेल व तरुण पिढी यातून बाहेर येईल, असे अनेक नागरिकांनी बोलून दाखविले.

थुंकणारांवर कारवाईचे प्रमाण कमी
कोविड कायद्यानुसार सार्वजनिक थुंकण्यास मनाई आहे. मास्क वापर केला नाही किंवा इतर काही नियमांचे पालन केले नाही तर शासकीय यंत्रणेद्वारे कारवाई केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, थुंकणारांवर कारवाई करून दंड जमा केल्याचे कोणतीच यंत्रणा सांगत नाही. किंबहुना यंत्रणेतही अनेक लोक थुंण्याबाबतचा नियम पाळतात की नाही, याबाबत शंका वाटते. थंकीमधून करोनाला आमंत्रण मिळत असेल तर यंत्रणेकडून गांभीर्याने थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्याची आव्यकता व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.