“बंद’ला प्रतिसाद “थंड’

पिंपरी – रिटेल क्षेत्रामध्ये सरकारने शंभर टक्‍के थेट परकीय गुंतवणुकीला दिलेल्या मंजुरीच्या विरोधात “कॅट’ या व्यापारिक संघटनेने देशव्यापी “भारत व्यापार बंद’चे आवाहन केले होते. शहरातील बहुतेक सर्वच व्यापारी आणि व्यावसायिक संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आणि समर्थन देण्याची घोषणा केली होती. परंतु शहरामध्ये तसेच उपनगरांमध्ये या “बंद’ला अतिशय थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. शहरातील सुमारे 4500 दुकानांपैकी 20 टक्‍के दुकाने देखील बंद नव्हती. सामान्य नागरीक तर दूरच परंतु कित्येक व्यापाऱ्यांनी देखील या “बंद’ बद्दल कल्पना नसल्याचे दिसून आले.

बंदच्या दोन दिवस आधी शहरातील सर्वच संघटना सक्रिय झाल्या होत्या. परंतु सर्व चर्चा आणि निर्णय केवळ पदाधिकाऱ्यांपर्यंतच मर्यादित राहिले आणि लहान व्यापाऱ्यांपर्यंत संघटनांचा संदेश पोहचू शकला नसल्याचे चित्र शुक्रवारी शहरामध्ये व उपनगरांमध्ये पहायला मिळाले. काही मोजके भाग सोडले तर शहरातील बहुतेक सर्व दुकाने सुरू होती. उल्लेखनीय आहे की, फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ पिंपरी-चिंचवड या शिखर संघटनेने देखील बंदमध्ये सहभागी होण्याची घोषणा केली होती. शहरातील 30 वेगवेगळ्या संघटनांनी या बंदला पाठिंबाही दिला होता. परंतु परकीय थेट गुंतवणुकीमुळे जगभरातील मोठ-मोठ्या कंपन्या देशात येऊन आपले बस्तान बसवतील व देशातील लहान-मोठ्या सात कोटी व्यापाऱ्यांवर संकट येईल, ही बाब कित्येक दुकानदारांना माहीतच नव्हती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बंद कशासाठी ?
रिटेल क्षेत्रामध्ये सरकारने शंभर टक्‍के परकीय थेट गुंतवणुकीला दिलेल्या मंजुरीमुळे देशातील लहान व्यापारी, उत्पादकांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वॉलमार्ट ही कंपनी फ्लिपकार्टच्या सहाय्याने भारतीय बाजारात प्रवेश करत आहे. यामुळे देशातील सात कोटी व्यापाऱ्यांवर यांचा विपरीत परिणाम होणार आहे. सरकारच्या निर्णयाविरुद्ध कॅट’ (कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स) या राष्ट्रीय संघटनेने राष्ट्रव्यापी “भारत व्यापार बंद’ पुकारला होता.

पुरवठा थांबला
सर्व दुकानांना माल पुरवठा करणाऱ्या कंज्युमर प्रॉडक्‍ट्‌स डिस्ट्रीब्युटर असोसिएशनने मात्र या बंदामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. शहरात जवळपास 140 वितरक आहेत. हे वितरक उतादकांचा माल किरकोळ व ठोक दुकानदारांपर्यंत पोहचवतात. असोसिएशनचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व शहराध्यक्ष मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व वितरक पुण्यामध्ये निघालेल्या रॅलीत सहभागी झाले होते. सर्व वितरकांना कडकडीत बंद पाळला होता. शहरातील सुमारे साडे चार हजार दुकानदारांपर्यंत पुरवठा बंदमुळे करण्यात आला नाही. परकीय थेट गुंतवणुकीमुळे वितरकांवरही विपरीत परिणाम होणार आहे. एकट्या महाराष्ट्रातून वितरक सरकारला 25 हजार 500 कोटी रुपयांचा महसूल देतात. हे सर्वाधिक संगठित क्षेत्र आहे. या क्षेत्रात 99.99 टक्‍के पारदर्शिता आहे, असे असतानाही सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत होत नाही. आता उलट त्रास देण्यास सुरुवात केली आहे.

ही तर सुरुवात
काही संघटनांच्या प्रतिनिधींनी याबाबत बोलताना सांगितले की अद्याप या मुद्दयाबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. परंतु ही आता सुरुवात आहे, हे आंदोलन पुढे मोठे स्वरुप घेईल. या आंदोलनाचा प्रारंभ दिल्ली येथील लाल किल्ल्यातून झाला आहे. आंदोलनाचा रथ ऑक्‍टोबर महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. कपडा, किराणा, इलेक्‍ट्रिक बहुतेक सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम होणार असल्याचे सर्वांच्याच लक्षात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)