फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा : नदाल, सिलिच, शापोव्हालोव्ह दुसऱ्या फेरीत 

पॅरिस – स्पेनचा अग्रमानांकित राफेल नदाल, क्रोएशियाचा तृतीय मानांकित मेरिन सिलिच, दक्षिण आफ्रिकेचा सहावा मानांकित केविन अँडरसन, अमेरिकेचा नववा मानांकित जॉन इस्नर आणि कॅनडाचा टीनएजर डेनिस शापोव्हालोव्ह या मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली.

तसेच जर्मनीचा मॅक्‍झिमिलियानो मार्टेनर व इटलीचा थॉमस फॅबियानो या बिगरमानांकितांनीही चमकदार विजयाची नोंद करताना पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. महिला एकेरीत तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझा, 24वी मानांकित दारिया गाव्हरिलोव्हा व 28वी मानांकित मारिया शारापोव्हा या मानांकितांसह समंथा स्टोसूर, फियानो फेरो आणि बेथॅनी मेटॅक सॅन्ड्‌स या प्रमुख बिगरमानांकित खेळाडूंनीही विजयी सलामी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरुष दुहेरीत रॉबर्ट फराह आणि युआन सेबॅस्टियन काबाल या पाचव्या मानांकित जोडीसह रॅव्हेन क्‍लासेन व मायकेल व्हीनस या दहाव्या मानांकित जोडीनेही आकर्षक विजयासह दुसरी फेरी गाठली. मिश्र दुहेरीत निकोला मेकटिक व अलेक्‍झांडर पेया या आठव्या मानांकित जोडीने विजयी सलामी दिली. त्याआधी अग्रमानांकति राफेल नदालने इटलीच्या सिमॉन बोलेल्लीचा कडवा प्रतिकार 6-4, 6-3, — असा मोडून काढताना पुरुष एकेरीच्या विक्रमी विजेतेपदाकडे पहिले पाऊल टाकले. तृतीय मानांकित मेरिन सिलिचने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचे आव्हान 6-3, 7-5, 7-6 असे सुमारे अडीच तासांच्या लढतीनंतर मोडून काढले. सहाव्या मानांकित केविन अँडरसनने इटलीच्या बिगरमानांकित पावलो लोरेन्झीवर 6-1, 6-2, 6-4 अशी मात करताना विजयी सलामी दिली. तसेच नवव्या मानांकित जॉन इस्नरने अमेरिकेचा गुणवान युवा खेळाडू नोआह रुबिनचा प्रतिकार 6-3, 7-6, 7-6 असा संपुष्टात आणताना दुसऱ्या फेरीत धडक मारली. अर्जेंटिनाच्या गायडो पेलाने जोआव सोसाची झुंज 6-2, 6-3, 6-4 अशी मोडून काढत विजयी सलामी दिली.

कॅनडाच्या युवा खेळाडू 24वा मानांकित डेनिस शापोव्हालोव्हने ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनचा 7-5, 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करताना विजयी सलामी दिली. दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर जर्मनीच्या मॅक्‍झिमिलियानो मार्टेररचे आव्हान आहे. मार्टेररने रयान हॅरिसनचा 6-1, 6-3, 7-5 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

मुगुरुझा, गाव्हरिलोव्हा यांची विजयी सलामी 
महिला एकेरीत तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझाने रशियाच्या स्वेतनाला कुझ्नेत्सोव्हावर 7-6, 6-2 अशी मात करताना विजयी सलामी दिली. तर 24व्या मानांकित दारिया गाव्हरिलोव्हाने पहिला सेट गमावल्यावर झुंजार पुनरागमन करताना सोराना सिर्स्टियाचे आव्हान 4-6, 7-6, 6-3 असे संपुष्टात आणले. 16व्या मानांकित एलिसे मेर्टेन्सने व्हार्व्हरा लेपचेन्कोवर 6-7, 7-6, 6-0 असा विजय मिळवीत आगेकूच केली. समंथा स्टोसूरने यानिना विकमायरचा 6-2, 6-4 असा धुव्वा उडविला. तर फियानो फेरोने कॅरोलिन विथहॉफ्टला 6-4, 6-2 असे सहज पराभूत केले. बेथॅनी मेटॅक सॅन्ड्‌सने योहाना लार्सनला 6-4, 6-3 असे नमवीत दुसरी फेरी गाठली. तसेच मारिया शारापोव्हाने रिचेल हूगनकॅम्पची झुंज 6-1, 4-6, 6-3 अशी मोडून काढताना विजयी सलामी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)