फ्रेंच ओपन टेनिस : मार्टेररची शापोव्हालोव्हवर सनसनाटी मात 

सिलिच, थिएम, फॉगनिनी यांचीही आगेकूच 

पॅरिस – जर्मनीच्या बिगरमानांकित मॅक्‍झिमिलियन मार्टेररने कॅनडाच्या 24व्या मानांकित डेनिस शापोव्हालोव्हचा चार सेटच्या झुंजीनंतर पराभव करताना येथे सुरू असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. नदाल व जोकोविच यांसारख्या बड्या खेळाडूंसाठी धोका ठरू शकणारा शापोव्हालोव्ह आज मार्टेररविरुद्ध मात्र सपशेल निष्प्रभ ठरला. मार्टेररने पहिला सेट गमावल्यावर जोरदार पुनरागमन करताना 5-7, 7-6, 7-5, 6-4 असा सनसनाटी विजय नोंदविला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय क्रोएशियाचा तृतीय मानांकित मेरिन सिलिच, ऑस्ट्रियाचा सातवा मानांकित डॉमिनिक थिएम, इटलीचा अठरावा मानांकित फॅबिओ फॉगनिनी या मानांकितांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत धडक मारली. मेरिन सिलिचने पोलंडच्या बिगरमानांकित हर्बर्ट हुरकाझचा प्रतिकार 6-2, 6-2, 6-7, 7-5 असा मोडून काढला. तर डॉमिनिक थिएमने ग्रीसच्या स्टेफानोस सिस्टिपासचे आव्हान 6-2, 2-6, 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले.

पुरुष एकेरीतील अन्य सामन्यात अठराव्या मानांकित फॅबिओ फॉगनिनीने स्वीडनच्या इलियास वायमेरला 6-4, 6-1, 6-2 असे पराभूत करीत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. तर अमेरिकेच्या बिगरमानांकित स्टीव्ह जॉन्सनने जर्मनीच्या यान लेनार्ड स्ट्रफची झुंज 6-4, 6-7, 6-2, 6-2 अशी मोडून काढताना तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. पाच सेटपर्यंत रंगलेल्या अत्यंत रंगतदार लढतीत इस्टोनियाच्या जर्गन झोपने बेल्जियमच्या रुबेल बेमेलमन्सवर दोन सेटच्या पिछाडीवरून 4-6, 4-6, 6-3, 6-4, 6-4 असा रोमांचकारी विजय मिळवीत तिसरी फेरी गाठली.
सिलिच, मुगुरुझा तिसऱ्या फेरीत दाखल

स्पेनची तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझा, बेल्जियमची 16वी मानांकित एलिसे मेर्टेन्स, स्लोव्हाकियाची 19वी मानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हा आणि ऑस्ट्रेलियाची 24वी मानांकित दारिया गाव्हरिलोव्हा या मानांकित महिला खेळाडूंनीही वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. तसेच माजी ग्रॅंड स्लॅम विजेती ऑस्ट्रेलियाच्या बिगरमानांकित समंथा स्टोसूरनेही 30व्या मानांकित ऍनेस्तेशिया पावलुचेन्कोव्हाचे आव्हान संपुष्टात आणताना सनसनाटी निकालाची नोंद केली.

महिला एकेरीतील आजच्या पहिल्या विजयाची नोंद करताना गार्बिन मुगुरुझाने बेल्जियमच्या बिगरमानांकित फिओना फेरोचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणताना तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. तसेच बेल्जियमच्या 16व्या मानांकित एलिसे मेर्टेन्सने इंग्लंडची अव्वल खेळाडू हीथर वॉटसनचा 6-3, 6-4 असा सहज पराभव करीत तिसरी फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाच्या बिगरमानांकित समंथा स्टोसूरनेही 30व्या मानांकित ऍनेस्तेशिया पावलुचेन्कोव्हाचा 6-2, 7-6 असा खळबळजनक पराभव करीत तिसऱ्या फेरीची निश्‍चिती केली.

स्लोव्हाकियाच्या 19व्या मानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हाने स्वित्झर्लंडच्या बिगरमानांकित बेलिंडा बेन्किकचा प्रतिकार 6-2, 6-4 असा मोडून काढत तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. तसेच ऑस्ट्रेलियाच्या 24व्या मानांकित दारिया गाव्हरिलोव्हाने अमेरिकेचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या क्रोएशियाच्या बिगरमानांकित बर्नार्डा पेराचा प्रखर प्रतिकार 5-7, 7-5, 6-3 असा मोडून काढताना तिसऱ्या फेरीत आपले आव्हान कायम राखले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)