फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षक भरतीची जाहिरात

पुणे – राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे. याबाबतच्या सूचनाही त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया गेल्या 6 महिन्यांपासून सुरू आहे. शिक्षण आयुक्‍तांनी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात शिक्षण आयुक्‍तांनी राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांकडून बिंदूनामावली तपासणीची सद्यःस्थिती, एकूण शिक्षकांची रिक्‍तपदे, जाहिराती प्रसिद्ध करण्याबाबतची तयारी याबाबींची वस्तुस्थिती जाणून घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुढील आठवड्यात राज्य शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडून बिंदूनामावलीची सर्व प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण करावी, अशा सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बिंदूनामावली तपासणी झाल्यानंतर लगेचच जाहिरात प्रसिद्ध कराव्यात. प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळामध्येच शिक्षकांच्या रिक्‍त पदांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या शाळांत शिक्षक भरती लवकर पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. खासगी शाळांकडून अद्यापही भरती प्रक्रियेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आढावा बैठकीतून उघड झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी किमान भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे खूप आवश्‍यक आहे, असे शिक्षण आयुक्‍तांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

बहुसंख्य अधिकाऱ्यांनी बैठकी आधीच शिक्षण आयुक्‍तांचा धसका घेतला होता. त्यामुळे बहुसंख्य अधिकाऱ्यांनी बैठकीला कागदपत्रांसह उपस्थित राहण्यासाठी प्राधान्य दिले. या बैठकीत शिक्षण आयुक्‍तांनी अधिकाऱ्यांची झाडाझडतीही घेतली असल्याचे समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)