फेंगशुई शास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जेसाठी फिशटॅंक

मृत मासे फार काळ टॅंकमध्ये ठेवू नयेत

सध्या जवळपास प्रत्येक घरामध्ये फिशटॅंक दिसतो. फिशटॅंक (अक्वेरियम) ठेवण्यामागे केवळ मनोरंजन हा उद्देश नसून, त्यामागे फेंगशुई शास्त्रही आहे. फिशटॅंकमुळे घरातील वातावरण आनंदी राहते. संकटे दूर होतात. घरात सुख आणि समृद्धी नांदते. मात्र, फिशटॅंक कसा ठेवावा. तसेच काय काळजी घ्यावी, यासाठी काही नियम आहेत. फेंगशुई पद्धतीच्या या नियमांचे पालन केल्यास, तुमचे जीवन अधिक समृद्ध होण्यास मदत होते.

फेंगशुई शास्त्रानुसार, फिशटॅंक हा पूर्व, उत्तर दिशेला किंवा पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये ठेवल्यास, वास्तूसाठी लाभदायक ठरतो. दाम्पत्यांमधील प्रेम आणि स्नेह कायम राखण्यासाठी फिशटॅंक हा मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला ठेवावा. उजव्या बाजूला ठेवल्यास, घरातील पुरुषांचा स्वभाव चंचल बनतो. फिशटॅंक हा स्वयंपाकघर (किचन) किंवा झोपण्याच्या खोलीमध्ये (बेडरूम) ठेवू नये. या ठिकाणी फिशटॅंक ठेवल्यास, नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे गृहकलह होण्याची शक्‍यता बळावते.

फिशटॅंकमुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा पसरण्यास मदत होते. मात्र, त्याची तितकीच काळजीही घेण्याची आवश्‍यकता आहे. टॅंकमधील पाणी विशिष्ट कालावधीनंतर बदलण्याची आवश्‍यकता आहे. टॅंकमधील माशांची संख्या नऊ असावी. त्यात लाल आणि सोनेरी रंगाच्या आठ तसेच काळया रंगाच्या एका माशाचा समावेश असावा. फिशटॅंकमधील मासे अधिक काळ जगत नाहीत.

ठरावीक कालावधीनंतर मासे मरण पावतात. मृत मासे फार काळ टॅंकमध्ये ठेवू नयेत. ते काढून गटार किंवा नाल्यामध्ये न फेकता, तलाव किंवा नदीमध्ये टाकावेत. फेंगशुईनुसार कुठलाही मासा मरतो, तेव्हा त्याच्यासोबत तो त्या-त्या घरातील संकटे, आपत्ती घेऊन जातो. त्यामुळे माशाची योग्य विल्हेवाट लावणे केव्हाही चांगले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.