Video : फिफा विश्वचषक – विश्‍वविजेत्यांचे अभूतपूर्व स्वागत 

लाखो पाठीराखे, विमानांची सलामी अन्‌ पोलीस दलाचा एस्कॉर्ट 
पॅरिस – भारतीयांसाठी विश्‍वचषक विजेत्या संघाचे स्वागत नवे नाही. परंतु क्रिकेट आणि फुटबॉलमधील विश्‍वचषक यांच्यात काय फरक आहे, हे फिफा विश्‍वचषक विजेत्यांच्या मायदेशात झालेल्या अभूतपूर्व स्वागतामुळे दिसून आले. तिरंगी राष्ट्रध्वज फडकावणारे लाखो पाठीराखे, हवाई दलाच्या विमानांची सलामी, शेकडो पोलिसांचा व्हीआयपी एस्कॉर्ट आणि उघड्या बसमधून तेथपर्यंत मिरवणुकीने येणाऱ्या विजयी वीरांचे अभिनंदन करण्यासाठी जमलेले लाखो चाहते यामुळे पॅरिसमध्ये स्वर्गच जमिनीवर उतरल्याचा भास होत होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विश्‍वविजेत्या संघाचे स्वागत करण्यासाठी किमान पाच लाख पाठीराखे चॅम्प्स एलिसीज येथे जल्लोष करीत थांबले होते. त्यांच्या हातातील फ्रान्सच्या तिरंगी राष्ट्रध्वजांमुळे सारे वातावरण भारले होते. चार्ल्स डी गॉल विमानतळावर हा संघ विमानातून उतरला, तेथेही हजारो चाहत्यांनी त्यांचे प्रचंड स्वागत केले. विमानातून ओळीने बसपर्यंत जातानाही या खेळाडूंनी आपला जल्लोष थांबविला नाही. तेथून उघड्या बसमधून मिरवणुकीने हे खेळाडू ज्यूस रिमेट विश्‍वचषक करंडकासह चॅम्प्स एलिसीजपर्यंत गेले. रस्त्यातही नागरिकांचा विजयोत्सव चालूच होता. त्यामुळे ही बस चॅम्प्स एलिसीज येथे पोहोचण्यास कित्येक तास लागले. दोन्ही बाजूंना असलेल्या सुसज्ज पोलिसांच्या ताफ्याने खेळाडूंच्या बसला मोटारसायकलवरून एस्कॉर्ट केले. त्यामुळे चाहत्यांच्या उत्साहाला त्यांना आवर घालता आला.

चॅम्प्स एलिसीज येथे हा संघ पोहोचताच हवाई दलाच्या विमानांनी फ्रेंच राष्ट्रध्वजातील लाल, पांढऱ्या आणि निळ्या रंगाच्या धुराचे पट्टे आकाशात सोडत विश्‍वविजेत्यांना नेत्रदीपक सलामी दिली. बसमधील पॉल पोग्बा, कायलियन एमबापे, अन्टोनी ग्रिझमन आदी स्टार खेळाडू सेलेब्रेशनमध्ये आघाडीवर होते. परंतु एन्गोलो कॅन्टे थोडा लाजाळू असल्यामुले बाजूलाच थांबला होता. अखेर त्याच्या हातात विश्‍वचषक देऊन खास छायाचित्रे काढण्यात आली. बेंजामिन मेंडी आणिँ सॅम्युएल उमटिटी हे खेळाडू या ऐतिहासिक प्रसंगाची छायाचित्रे आपल्या मोबाईलमध्येघेऊन ती इन्स्टाग्रामवर टाकण्यात दंग झाले होते.

त्यानंतर या संघाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या निवासस्थानाकडे नेण्यात आले. तेथे राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी यांनी या खेळाडूंचे स्वागत केले. तेथे झालेल्या फोटो सेशनमध्ये राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन व विजयी संघाचे प्रशिक्षक देसचॅम्प्स यांनी हातात हात घालून करंडकासह छायाचित्रे काढली. तसेच मॅक्रॉन यांनी खेळाडूंसोबत फोटो सेशनही केले. या कार्यक्रमानंतर राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी या वीरांसाठी खास स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)