फारुख अब्दुल्लांच्या स्थानबद्धतेची मुदत 3 महिने वाढवली

श्रीनगर :  जम्मू आणि काश्‍मीरचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या फारुख अब्दुल्ला यांना ताब्यात ठेवण्याची मुदत आज 3 महिन्यांनी वाढवण्यात आली. त्यामुळे फारुख अब्दुल्ला यांना आणखी तीन महिने त्यांच्याच घरामध्ये स्थानबद्ध ठेवण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाचे रुपांतरच सबजेलमध्ये करण्यात आले आहे.

जम्मू आणि काश्‍मीर या केंद्रशासित प्रदेशासाठी नेमलेल्या गृह विभागाच्या सल्लागार समितीच्यावतीने अब्दुल्ला यांच्या प्रकरणाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये सामाजिक सुरक्षा कायद्याखाली अब्दुल्ला यांच्या स्थानबद्धतेचे मुदत आणखी 3 महिन्यांनी वाढवण्याची शिफारस करण्यात आली. सामाजिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करण्यात आलेले फारुख अब्दुल्ला हे जम्मू काश्‍मीरचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

या कायद्यानुसार कोणत्याही खटल्याशिवाय एक वर्षापर्यंत स्थानबद्ध करण्याची तरतूद आहे. ही मुदत संपल्यवर दोन वर्षांपर्यंत स्थानबद्ध केले जाऊ शकते. सामाजिक सुरक्षा कायद हा केवळ जम्मू काश्‍मीरमध्येच लागू आहे. देशात अन्यत्र हा कायदा राष्ट्रीय सुरक्षा कायदा या नावाने ओळखला जातो.

अब्दुल्ला यांच्याव्यतिरिक्‍त त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अन्य काही नेत्यांनाही 5 ऑगस्टपासून स्थानबद्ध करण्यात आले आहे. स्थानबद्धतेला मुदतवाढ देण्याच्या निर्णयावर फारुख अब्दुल्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.