फलटण सजाचे विभाजन, महसुली कामांना येणार वेग

फलटण :
कृष्णेच्या पाण्याद्वारे संपूर्ण तालुका बागायत होत असताना, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातही वाढ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर फलटण शहर व परिसरातील वाढत्या लोकवस्तीमुळे फलटण शहरात असलेल्या एकमेव तलाठी कार्यालयावर येणारा ताण कमी करण्यासाठी फलटण सजाचे विभाजन करुन फलटण, मलटण, धुळदेव, फरांदवाडी, कोळकी अशा नवीन सजांचा प्रस्ताव मंजूर झाल्याने फलटण तलाठ्यावर येणारा कामाचा ताण कमी होवून लोकांची महसूल खात्याकडील कामे वेळेत होण्याबरोबर महसूली वसूली व अन्य कामे पूर्ण करण्यास सक्षम यंत्रणा निर्माण होणार आहे.
फलटण या मुळ सजाचे विभाजन करुन मलटण, धुळदेव, फरांदवाडी हे 3 सजे नव्याने निर्माण करण्यात आले असून कोळकी, झिरपवाडी सजाचे विभाजन करुन कोळकी हा स्वतंत्र सजा निर्माण करण्यात येत आहे. या सजातील झिरपवाडी सध्याच्या जाधववाडी सजाला जोडण्यात येत आहे तर सध्याच्या 9 महसूल मंडलामध्ये (सर्कलमध्ये) कोळकी या नवीन महसूल मंडलाची (सर्कल) निर्मिती करण्यात येत असल्याने फलटण तालुक्‍यात सध्या असलेल्या 9 महसूल मंडलांची (सर्कल) संख्या 10 होणार आहे.
फलटण येथे मुळ सजा आणि केवळ एकच गाव कामगार तलाठी कार्यरत असल्याने फलटण शहर व परिसराचा विशेषत: कोळकी, फरांदवाडी, जाधववाडी परिसरात सुरु असलेल्या लोकवस्तीच्या विस्ताराचा ताण या एका तलाठ्यावर येत असल्याने एवढ्या मोठ्या क्षेत्रातील विविध परवाने, महसूल वसूल, पीक पाणी पाहणी व नोंदणी त्याचबरोबर अन्य अनुशंगीक कामे, बेकायदेशीर वाळू वाहतूकीवर निर्बंध त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या 7/12 संगणकीकरण कामातून एक तलाठी पुरेसा वेळ देवू शकत नसल्याने फलटण सजाचे विभाजन करुन वर नमुद केल्याप्रमाणे मलटण, धुळदेव आणि फरांदवाडी हे नवे सजे निर्माण करुन त्याचबरोबर कोळकी, जाधववाडीचे विभाजन करुन कोळकी स्वतंत्र सजा निर्माण केल्याने फलटण येथील एका तलाठ्याच्या जागी आता 5 तलाठी काम करणार असल्याने कामाचे योग्य विभाजन होवून तलाठी कार्यालयाकडील कामात गतीमानता आणणे शक्‍य होणार आहे.
त्याचप्रमाणे फलटण येथील एका महसूल मंडलाधिकाऱ्याच्या (सर्कल) जागी आता फलटण आणि कोळकी हे दोन महसूल मंडलाधिकारी कार्यरत राहणार असल्याने त्या माध्यमातूनही तलाठी स्तरावरील कामात गती आणणे शक्‍य होणार आहे.
फलटण तालुक्‍यात सध्या कार्यान्वित असलेल्या 9 महसूल मंडलाच्या (सर्कल) आता 10 महसूल मंडले (सर्कल) आणि 57 सजांच्या जागी 60 सजे निर्माण होणार असल्याने तलाठी पातळीवरील महसूल कामांना गती प्राप्त होण्याबरोबरच महसूली वसूलीला प्राधान्य दिले जाईल अशी अपेक्षा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)