फलटणला धनगर समाजाचे दुसऱ्या दिवशीही धरणे

फलटण, दि. 30 (प्रतिनिधी) – फलटणमध्ये धनगर समाज आरक्षण कृती समितीने एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू होते. दुसऱ्या दिवशी धनगरबांधवांनी शेळ्या-मेंढ्यांसह आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, शिंदेवाडी, तडवळे, सस्तेवाडीचे ग्रामस्थ व वकील संघटना व मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठींबा दिला.
धनगर समाजान एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होण्यासाठी रविवारी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून दुसऱ्या दिवशीच्या आंदोलनास सुरवात करण्यात आली. यावेळी आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी केला. सरकारने चालढकल केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्र्यांना रस्त्यावर फिरू न देण्याचा निर्णय घ्यावा लागेल. आंदोलनातील कार्यकर्त्यांचा संयम सुटल्यास जबाबदारी पूर्णत: शासनावर राहणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
दरम्यान, राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीची महत्वपूर्ण बैठक दि 30 रविवारी बारामतीच्या बांधकाम विश्रामगृहात पार पडली. कृती समितीचे अनेक सदस्य बैठकीस उपस्थित होते. मराठा आरक्षणापाठोपाठ आता धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा तीव्र करण्याचा निर्णय बारामतीतील बैठकीत घेण्यात आला. धनगर समाज आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचे आजच्या बैठकीत निश्‍चित करण्यात आले. आंदोलनात एकसूत्रीपणा असावा, या उद्देशाने दि. 5 रोजी रविवारी पुण्यात बैठक आयोजित केली असून राज्यभरातील सर्व सामाजिक संघटना, विविध पक्षातील समाजाचे नेते व समाजाचे दोन्ही मंत्री, खासदार, आजी माजी आमदार व कृती समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांची व्यापक बैठक बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)