फलटणमध्ये लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’

तक्रारदाराचेच केले अपहरण; रक्षकच भक्षक झाल्याचे चित्र

प्रशांत जाधव, सातारा

लाचखोरी हा आपल्या यंत्रणेला जडलेला आजार असल्याचे अनेकदा समोर आले आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात महाराष्ट्राला हादरवुन सोडणारा लाचखोरीचा ‘अभिजीत पॅटर्न’ पुढे आला आहे. लाचखोर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत पाटील यांनी सापळ्याचा संशय आल्याने चक्क तक्रारदाराचे अपहरण करून त्याला चालत्या गाडीतून ढकलुन दिल्याने त्यांच्याविरोधात समाजासह पोलीस दलातही संताप व्यक्त केला जात आहे.

खंडाळा तालुक्यातील एका व्यक्तीची काही दिवसापुर्वी आर्थिक फसवणूक झाली होती. त्या गुन्ह्याचा तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत पाटील यांच्याकडे होता. गुन्ह्याची व्याप्ती अन् फसवणूक झालेला साडे आठ लाखांचा आकडा पाहता पाटील यांच्या तोंडाला पाणी सुटणे हे त्यांच्या दृष्टीने काही गैर नसावे.

याबाबत एसीबीच्या सुत्रांच्या माहितीनुसार थोडक्यात हकीकत अशी की, खंडाळा पोलीस ठाण्यातभा.द.वि.सं.क.420,34 प्रमाणे दाखल गुन्हा नंबर 21/2019 यातील कदम नावाच्या व्यक्तीचा 8 लाख रुपयांचा डी. डी. तक्रारदार यांना मिळवुन देण्यासाठी पाटील यांनी दोन लाख पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार व पाटील यांच्यात तडजोड झाल्यानंतर पाटील यांनी एक लाख पंच्चाहत्तर हजार रुपये स्विकारण्याची तयारी दाखवली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी याची माहिती पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

मिळालेल्या तक्रारीची खात्री करून एसीबीचे पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी अप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांना कारवाईचे आदेश दिले होते. चव्हाण यांनी लागलीच पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, श्रीमती कांचन जाधव , पो. ना. माळी, कुंभार या कर्मचार्‍यांसह सापळा कारवाईचे आयोजन करून फलटण येथे सापळा लावला होता. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील यांना एसीबीचा सापळा लागल्याची शंका आल्याने पाटील यांनी तक्रारदाराचे अपहरण करून त्याला स्वत:च्या गाडीतून पळवुन नेले.

पाटील यांनी अपहरण केलेल्या तक्रारदाराचा मोबाईल तसेच एसीबीने तक्रारदारांकडे दिलेला व्हाईस (आवाज) रेकॉर्डर गायब केला. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला चालत्या गाडीतून ढकलुन देण्याचा पराक्रमही करून दाखवला आहे. याप्रकरणी पाटील यांच्याविरोधात तक्रारदाराचे अपहरण करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, लाच मागणे अशा विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. पाटील हे स्वत: उच्चशिक्षित आहेत.मग सामान्य माणसाला लाच मागणे या गुन्ह्यापाठोपाठ त्याला चालत्या गाडीतून ढकलण्याचा उन्माद नेमका कसा घडला? गावागावातील शाळा, कॉलेजात झोडलेली ती प्रमाणिकपणाची भाषणे फक्त बोलाची कडी अन् बोलाचा भातच होती का? असे संतप्त सवाल आता विचारले जात आहेत.

गेली काही दिवस सातारा जिल्हा पोलीस दलात डीवायएसपींच्याच बाबतीत घडलेल्या काही घटनांवर नजर टाकली अन् पाटील यांच्या या भानगडींचे अवलोकन केले तर नक्कीच राज्याचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सन 2018 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये केलेल्या ’क्रिमिनल्स इन युनिफॉर्म’ (खाकीतली गुन्हेगारी!) या वाक्याची आठवण सातारकरांना झाल्याशिवाय राहत नाही.

कारण अभिजीत पाटील यांनी लाच मागितली यावरच ते थांबले असते तर त्यांना कदाचीत सहानुभुती मिळाळी असती. मात्र चक्क तक्रारदाराचे अपहरण करणे हे कृत्य कायदा ज्याच्या घरी लक्ष्मी म्हणून नांदतो किमान त्याला तरी हे शोभत नाही.’क्रिमिनल्स इन युनिफॉर्म’ या एका शब्दावर जोर देत पडसलगीकर यांनी झारीतील शुक्राचार्यांना एकप्रकारे सावध राहण्याचा संदेश दिला होता. खरे तर राज्याच्या तत्कालीन डीजींना या विषयाचे गांभीर्य वाटावे म्हणजे किती खोलवर या भानगडी रुजल्या असतील याचा विचार न केलेलाच बरा.

पोलिस आणि महसूल या विभागातील लाचखोरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच (एसीबी) नव्हे तर सरकारसाठी डोकेदुखी ठरते. अगदी 50 रुपयांपासून लाखो रुपये उकळण्याचे प्रकार या विभागात सुरू असतात. अर्थात, पकडला तो चोर, असा नियम महत्त्वाचा ठरतो. इतर ठिकाणी लाचखोरी होतच नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरू शकते. कायद्याचे पूर्ण पाठबळ असल्याने पोलिसांमधील लाचखोरी हा विषय गंभीर ठरतो.

नागरिकांच्या मनात पोलिसांची प्रतिमा नक्की कशी असते, त्यावर पोलिसांचे यशापयश अवलंबवून असते, याचे भान अधिकार्‍यांनी आता राखायलाच हवे. अर्थात, पोलिसांवर होणारा हा आरोप नवीन नाही. दुसरीकडे सर्वच पोलिस खाकीआड गुंडागर्दी, वसुली करतात असे म्हणणे म्हणजे प्रामाणिकपणे काम करणार्‍यां कर्मचारी अधिकार्‍यांवर अन्याय केल्यासारखे होईल. हे सगळे लिहण्याचा अन्वयार्थ असा आहे की, झारीतील शुक्राचार्यांमुळेच संबंध पोलिस यंत्रणा बदनाम होत आहे.

वरिष्ठांच्या प्रयत्नाला कनिष्ठांचा खो
जिल्ह्याची सुत्रे हाती घेतल्यापासून जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पारदर्शक कारभाराकडे लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी वाहतूक पोलीसांना वाहनधारकांच्या पावत्या न करण्याच्या सुचना केल्या. मात्र गत काही दिवसापासून पोलीस दलातील बडे पद असलेल्या उपविभागीय अधिकार्‍यांच्या भानगडीमुळे पोलीस दलात अस्वस्थता पसरली आहे. एकाबाजुला एसपी,अतिरीक्त एसपी पारदर्शक कारभारासाठी मेहनत घेत असताना, काही कनिष्ठ अधिकारी मात्र याच कामाला पद्धतशीर खो घालण्याचे काम करत आहेत.

(एसीबीचा कारभार म्हणजे ,अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.  उद्याच्या भागात )

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.