फलटणमध्ये मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

 

सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलटण, दि. 26 (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एक दिवसीय कडकडीत बंद यशस्वी केल्यानंतर आजपासून फलटण शहर व तालुक्‍यातील मराठा समाजाच्यावतीने फलटण तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. प्रारंभी बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर बळीराजांचे पूजन करण्यात आले. यानंतर महिलांच्या हस्ते प्रांत अधिकारी संतोष जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आरक्षणाबाबत निर्णय त्वरीत न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
याबाबत निवेदनात मराठा आरक्षणाबाबत शासनाने त्वरीत निर्णय घेवून मराठा तरुण मुला-मुलींना नोकरीत व शिक्षणात आरक्षण दिले पाहीजे. ऍट्रसिटी कायदा रद्द झाला पाहिजे, शासनाने मूक मोर्चावेळी मराठा समाजातील तरुण मुलामुलींना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतीगृह व शासकीय कर्ज याबाबत जाहीर केलेल्या सर्व योजनांची त्वरीत अंमलबजावणी व्हावी, शेतीविषयक स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरीत अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहे. मराठा समाजाने आरक्षण मागणीकरीता विविध ठिकाणी जिल्हा आणि तालुका स्तरावर अनेक मोर्चे काढले. मुंबई येथेही निर्णायक मोर्चा काढला. मात्र, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले आहे. त्यांची वक्तव्ये दिशाभूल करणारी असून विधिमंडळातही अनेक आमदार आणि पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत मागणी केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पुन्हा आरक्षणासाठी आंदोलने सुरू झाली असून फलटणलाही आता निर्णायक आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार ठोस निर्णय जाहिर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आंदोलन शांततेत करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)