फलटणमधील घोड्याच्या यात्रेचा उद्या मुख्य दिवस

महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी भाविकांनी गजबजली

कोळकी, दि.22 (वार्ताहर) – महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी आणि चक्रपाणी महाराजांची जन्मभूमी असलेल्या व वेगळे महत्त्व प्राप्त झालेल्या फलटणनगरीत प्रसिध्द घोड्याची यात्रा दि 19 एप्रिलपासून सुरू झाली असून दि 24 एप्रिलपर्यंत यात्रा असणार आहे. दि. 24 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.

महानुभाव पंथीयांची येथे आबासाहेब, बाबासाहेब, जन्मस्थान, रंगशीळा अशी 4 प्रमुख मंदिरे आहेत. त्याशिवाय शहरात शिंपी गल्ली, रविवार पेठ, महतपुरा पेठ यासह अन्य ठिकाणी या पंथीयांची अनेक मंदिरे व मठ आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागासह परप्रांतातूनही महानुभाव पंथीय उपदेशी व अन्य भाविक येथे मोठ्या संख्येने यात्रेसाठी येतात. यात्रेच्या पहिला दिवसापासून दररोज सायंकाळी 7 वाजता छबीना काढण्यात येतो. शहराच्या पश्‍चिमेकडील भागात, बाणगंगा नदीकाठी असलेल्या पुरातन श्रीबाबासाहेब मंदिरापासून छबिन्याला सुरुवात होते. छबिन्यामध्ये भाविक मानकरी आपल्या खांद्यावर पितळी घोडे घेवून सहभागी होतात. या छबिन्यामध्ये मोठ-मोठे ढोल वाद्याच्या स्वरुपात वाजवण्यात येतात. यात्रेच्या आदल्यादिवशी दि. 23 रोजी संध्याकाळी 8 वाजता छबिना व झांज पथक असून या ठिकाणी सुंदर श्री कृष्ण यांची पौराणिक देखावे सादर करतात. बाबासाहेब मंदिर, सुभाष चौक, चावडी चौक, बारस्कर चौक, मारवाड पेठ या मार्गाने छबीना रात्री 10वाजेपर्यंत आबासाहेब मंदिरात पोहोचतो. तेथे गेल्यानंतर आरती होवून छबीना समाप्त होतो.
दि.24 रोजी मुख्य दिवस असून मानकरी सकाळी 10 वाजता श्रीकृष्ण मंदिर येथून मानाचा घोडा वाजत गाजत डोक्‍यावर घेऊन बाणगंगा नदी येथून नेवून त्यास दही दूध पंच अमृतांनी स्नान घालून त्यास पुष्पहार दवणा डोक्‍यावर लावून श्रीकृष्ण मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ठेवला जातो. गुरुवार, दि. 24 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून त्यादिवशी दुपारी आबासाहेब मंदिरातील आरती संपल्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती पालखीत विराजमान करण्यात येते.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महास्थानाचे पालखीचे पूजन होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूजन होवून पालखी व यात्रेस सुरुवात होते. यात्रेत मानकऱ्यांच्या खांद्यावर पितळी घोडे, त्यापाठीमागे पालखी व अन्य मानकरी असतात. हा सोहळा आबासाहेब मंदिरापासून दगडी पूल मार्गे श्रीकृष्ण मंदिरात (बाबासाहेब मंदिर) पोहोचतो. तेथून चावडी चौक, बारस्कर चौक, महादेव मंदिर मार्गे बाणगंगा नदीतून पितळी घोडे पाणी पिण्यासाठी मानकरी नदीपर्यंत पळत घेवून जातात. या पध्दतीने बाणगंगा नदीतून बारवबाग, मलठण, दत्त मंदिर, शुक्रवार पेठेतून पालखी श्रीकृष्ण मंदिर (बाबासाहेब मंदीर) आणि पुन्हा आबासाहेब मंदिरात पोहोचल्यानंतर पालखी सोहळा समाप्त होतो. त्यानंतर यात्रेसाठी आलेले भाविक मंदिरातील आरती व सर्व ठिकाणी दर्शन घेवून परततात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.