प्लेटलेट्‌सचे महत्त्व

डॉ. एस. एल. शहाणे

डेंग्यू, मलेरियासारख्या आजारात प्लेटलेट्‌सची संख्या कमी झाल्याने रुग्ण दगावल्याच्या बातम्या हल्ली आपण वाचत आहोत. या बातम्या वाचून “प्लेटलेट्‌स म्हणजे काय?’ हा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्‌स हाही रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या “प्लेटलेट्‌स’ नावाच्या पेशी करतात. या पेशी मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना “प्लेटलेट्‌स’ हे नाव दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत “थ्रोम्बोसाइट्‌स’ ही संज्ञा वापरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्‌स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये “प्लेटलेट्‌स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्‌स या मोठ्या हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्‌स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्‌स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.
प्लेटलेट्‌सचं कार्य

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्‍सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते. एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी “प्लेटलेट्‌स आणि फायबर’ एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्‌सना मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

प्लेटलेट्‌सची संख्या किती असते?
मानवी शरीरातील प्लेटलेट्‌सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास, शरीराचा तो भाग बधिर होऊन निकामी होऊ शकतो.
संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरड्यांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्राव आटोक्‍यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

प्लेटलेट्‌स कमी होण्याची कारणं…
1. डेंग्यू, मलेरियाचा ताप
2. अनुवंशिक आजार
3. केमोथेरपी
4. संख्या कमी झाल्यास..

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्‌सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास, त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्‌याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

प्लेटलेट्‌सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी :
1. लसूण खाऊ नये.
2. अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करू नये.
3. ऍस्प्रिन, कोल्ड डॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
4. दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
5. सुया, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
6. बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
7. त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा.
प्लेटलेट्‌स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत. प्लेटलेट्‌ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत. पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्‌सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं. त्यामुळे सर्व रक्तघटकांमध्ये प्लेटलेट्‌स अर्थात तंतुकणिकांची संख्या कायम रहाणं आवश्‍यक असतं.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)