प्लॅस्टिक बंदी नावालाच!

बंदी कागदावरच : 17 लाख 25 हजारांचा दंड तरीही सर्रास वापर
पिंपरी- राज्य शासनाने मोठा गाजावाजा करुन प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला. मात्र, प्लॅस्टिक बंदी राज्यात अनेक ठिकाणी फसली असल्याचेच दिसत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात प्लॅस्टिक बंदी कागदावरच दिसत असून, शहरातील हातगाड्यासह दुकानामध्ये सर्रास प्लॅस्टिकचा वापर होतोय. एप्रिल ते डिसेंबर 2018 या कालावधीत महापालिकेने 343 व्यावसायिकांवर कारवाई केली असली तरी प्लॉस्टिकचा सर्रास वापर होत असताना कारवाई मात्र शून्य आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, 50 मायक्रॉनखालील प्लॅस्टिक कॅरिबॅगच्या वापरावर बंदी आहे. तर दुसरीकडे पर्यावरणास हानिकारक असलेल्या असलेल्या प्लॅस्टिकवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यानंतर महाराष्ट्रास पिंपरी-चिंचवड शहरात प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर करणाऱ्यावर कारवाया करण्यात आल्या. पिंपरी-चिंचवड शहरातही सुरवातीच्या काळात कॅरिबॅग वापरणाऱ्यावर धडाक्‍यात कारवाई करण्यात आली होती. शासनाने प्लॅस्टिक कॅरिबॅग दिसल्यानंतर पाच हजार रुपयाचा दंड आकरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, व्यापाऱ्याकडून शेकडो किलो प्लॅस्टिक जप्त केल्यानंतरही त्यांच्याकडून पाच हजारांचाच दंड आकरण्याच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, अनेक व्यापऱ्यांनी ही प्लॅस्टिक बंदी गांभिर्याने घेतलीच नाही. प्रशासनाकडून केवळ पाच हजार रुपयाचा दंड आकरण्यात येत असल्याने मोठ्या व्यापाऱ्यासह छोट्या व्यापाऱ्यांनी प्लॉस्टिकचा वापर सुरुच ठेवला आहे. परिणामी शहरात प्लॉस्टिक बंदीचा पुर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महापालिकेकडुन केवळ कागदोपत्री कारवाई सुरु असल्याचे दिसत आहे. मागच्या वर्षी एप्रिल 2018 ते डिसेंबर 2018 मध्ये महापालिकेने शहरातील 343 व्यावसायीकांवर प्लॉस्टिकचा वापर केल्याबद्दल कारवाई केली आहे. त्यांच्याकडुन 17 लाख 25 हजार रुपयाचा दंडही वसुल केला. मात्र, प्लॉस्टिक वापर रोखण्यात महापालिका कर्मचाऱ्यांना अपयश आल्याचे दिसत आहे.

शहरातील अनेक दुकानासह हातगाड्यावरही प्लॉस्टिकचा बिनधास्त वापर होताना दिसून येत आहे. दुकानदार व हातगाडेवाले प्लॉस्टिक बॅगेत साहित्य देत असल्याने नागरिकही मुक्तपणे प्लॉस्टिकचा वापर करीत आहेत. शहरातील हे चित्र झाल्यानंतर खरच प्लॉस्टिकबंदीचा निर्णय झाला आहे का? असा प्रश्‍न सुजाण नागरिकांतून विचारला जावू लागला आहे.

प्लॅस्टिकचा वाढता कचरा डोकेदुखी…
शहरात प्लॅस्टिकचा वापर सर्रास होत असल्याने प्लॉस्टिकचा कचरा कमी होण्याचे नाव घेत नाही. परिणामी शहरातील अनेक ठिकाणी प्लास्टिक कचरा पहायला मिळत आहे. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी निट होत नसल्याने हि स्थिती पहायला मिळत असून आता उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. त्यामुळे पाणी पाऊच सुरु झाले तर नवल वाटू नये.

बंदीनंतरही पुरवठा कसा?
प्लॅस्टिक बॅंगच्या बंदीनंतरही प्लॅस्टिक बॅगचा पुरवठा कसा होतो? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. बंदीचा निर्णय झाल्यानंतरही उत्पादन सुरु आहे का? त्याच नियमित पुरवठा होता का? याची साधी कल्पनाही प्रशासन किंवा शासनाला नाही का? असे प्रश्‍न या निमीत्ताने उपस्थित होत आहे. मात्र, याची उत्तर देण्यास कोणीच पुढे येत नाही.

11 हजार 954 किलो प्लॅस्टीक जप्त
मागच्या वर्षी एप्रिल महिन्यापासुन महापालिकेकडून प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यावसयिक व नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. या कालावधीत अत्तापर्यंत महापालिकेने सर्वच प्रभाग कार्यालयात मिळून 11954 किलो प्लॅस्टिक व 445 किलो थर्माकोंल माल जप्त केला आहे. मागच्या काही दिवसापासून कारवाई होत नसल्याने पुन्हा एकदा शहरात प्लॅस्टिकचा वापर वाढू लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.