प्लॅस्टिक बंदीला हरताळ!

  • कामशेत बाजारपेठेत प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
  • ग्रामपंचायतीकडून बघ्याची भूमिका; पर्यावरणप्रेमींनी व्यक्‍त केली चिंता

कामशेत – राज्य शासनाच्या प्लॅस्टिक बंदीला शहरी भागाबरोबरच ग्रामीण प्रशासनाकडून हरताळ फासला जात असल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. कारवाईचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले असताना स्थानिक प्रशासन कारवाईचा आखडता हात घेतल्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा बोऱ्या वाजला आहे. कामशेत बाजारपेठ आणि परिसरात खुलेआम प्लॅस्टिकचा विक्री होत असताना ग्रामपंचायत प्रशासनाकडून तकलादू कारवाई करीत मोहिमेला कोलदांडा दाखविला आहे. प्रशासनाच्या या कुचकामी धोरणामुळे पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्‍त केली आहे.

राज्य सरकारने 23 मार्च 2018 रोजी अधिसूचना काढत लागू केलेली सरसकट प्लॅस्टिकबंदी तीन महिन्यानंतर अर्थात 23 जूनपासून काटेकोर लागू झालेली आहे. या संदर्भातील कारवाईचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थाना दिले होते. सुरवातीच्या काळात प्लॅस्टिक पिशव्या वापरल्यास कडक कारवाई करणार असल्याचे स्थानिक स्वराज्य संस्था सांगत होत्या. पण त्यानंतर मात्र कामशेत बाजारपेठेत सर्वत्र प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होताना दिसत आहे. सुद्धा ग्रामपंचायत बघ्याची भूमिका घेत आहे व प्लॅस्टिक बंदीनंतर ग्रामपंचायतीकडून शून्य कारवाई होताना दिसत आहे. कारवाई होत नसल्याने व खुलेआम प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर वाढत असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कामशेत ही मावळ तालुक्‍यातील मुख्य व मोठी बाजारपेठ असल्याने कामशेत बाजारपेठेत विविध प्रकारची व्यावसायिक, दुकाने आहेत. कामशेतमधील किराणा माल, चिकन मटन व मच्छी विक्रेते, फळविक्रेते, भाजीवाले, हॉटेल व्यावसायिक, चहा वाले, फुले व हार विक्रेते, स्वीट होम, कपड्याच्या दुकान आदी दुकानात सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्याचा वापर सुरू आहेत. प्लॅस्टिक बंदीनंतर प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा पुरवठा बंद झाल्याने विक्रेत्यांना नाइलाजास्तव कापडी व कागदी पिशव्या ग्राहकांना द्याव्या लागत होत्या. पण आता पुन्हा प्लॅस्टिक पिशव्या व प्लॅस्टिकचे ग्लास व चहाच्या कपाचा पुरवठा होत असल्याने आम्ही वापरत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. प्लॅस्टिक बंदीनंतर नागरिकांमध्ये संभ्रम होता, मात्र त्याचा फायदा सध्या व्यापारी घेताना दिसत आहेत.

शहरात प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढीग
व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, विक्रेत्यांकडून सर्रासपणे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात आहे. मात्र ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याने प्लॅस्टिक वापर करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणास हा वाढता प्लॅस्टिक वापर हानिकारक ठरत आहे. प्लॅस्टिकच्या अतिवापरामुळे कामशेतमधील कचऱ्याच्या ढिगांमध्ये देखील प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा सर्वाधिक दिसतो आहे. अनेक लोक घरातील कचरा व शिल्लक खाद्यपदार्थ प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून कचऱ्याच्या ढिगात टाकतात. त्यामुहे कचऱ्याभोवती गायी, कुत्री, डुकरे यांसारख्या जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक पिशव्या जाऊन त्यांच्या जीवास धोका निर्माण होत आहे.

प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे
एकीकडे सामाजिक संघटना स्वखर्चाने कापडी पिशव्या वाटत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांना पर्यावरणाचा समातोल राखण्यास अपयश येताना दिसत आहे. प्लॅस्टिक बंदी असताना कामशेतमध्ये सर्रास प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिकचे कप, थर्माकोलची ताटे यांची विक्री सुरू आहे. यावर ग्रामपंचायत कारवाई का करीत नाही, असे ग्रामसेवक प्रताप माने यांना विचारले असता आम्ही कारवाई सुरू केली आहे. किती दुकानात कारवाई केली असे विचारले असता माने यांनी उडवा उडवीची उत्तरे देत माहिती देण्याचे टाळले.

प्लॅस्टिक बंदीवर सरसकट बंदी घालावी, अन्यथा प्लॅस्टिक बंदीचा कायदा करून काय उपयोग झाला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पर्यावरणास हानिकारक असणाऱ्या प्लॅस्टिक पिश्‍व्याचा वापर बंद व्हावा म्हणून मावळात अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढाऱ्यांनी घरोघरी जाऊन मोफत कापडी पिशव्या वाटल्या, पण त्यांचा मूळ हेतू आता निष्फळ ठरत असल्याने सामाजिक कार्यकर्ते नाराजी व्यक्‍त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)