प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाला केराची टोपली

जुन्नर तालुक्‍याच्या छोट्या-मोठ्या गावांमध्ये सर्रास वापर

खोडद =राज्य शासनाने प्लॅस्टिक व थर्माकोलपासून बनविल्या जाणाऱ्या वस्तूंच्या उत्पादन वापर, साठवणूक, वितरक, विक्री व वाहतूक करण्यास पूर्णत: बंदी करण्यात आली असली तरीही या शासनाच्या धोरणाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.

जुन्नर तालुक्‍यात खोडद, मांजरवाडी, सावरगाव, आर्वी या छोट्या गावांपासून नारायणगाव, जुन्नर, ओतूर, बेल्हे, आळेफाटा या प्रमुख बाजारपेठा असणाऱ्या गावांमध्येही सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर आजही होत असल्याचे दिसत आहे.आपले गाव प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी तालुक्‍यातील अनेक गावा-गावांमध्येही महिन्यापूर्वी रॅली काढून फ्लेक्‍सबाजी झाली होती; परंतु याची अंमलबजावणी कोठेही व्यवस्थित झाल्याचे दिसत नाही. ग्रामपंचायतींनी त्यांच्या गावातील हॉटेल, इतर व्यवसायिक, संस्था, ढाबे, फेरीवाले, भाजीवाले, तसेच किरकोळ विक्रेते या सर्वांना प्लॅस्टिक पिशव्या आणि थर्माकोलच्या वस्तू वापरू नये आणि वापरल्यास 15 हजार रुपये दंड होणार असल्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही व्यवसायिक व इतर दुकानदार प्लॅस्टिक पिशव्याचा सर्रास वापर करीत आहेत.

प्लॅस्टिक पिशव्या वापरासंदर्भात एका व्यवसायिकशी चर्चा केली असता त्याने सांगितले की, प्लॅस्टिक पिशव्या बंद केल्या तर ग्राहकांना माल घरी न्यायचा कसा, असा प्रश्न पडत आहे. आम्ही प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी दुसऱ्या पिशव्यांचा वापर केला तर या पिशवीचा प्रती नग किमत 5 ते 10 रुपये असल्याने हा खर्च सोसायचा कोणी, हा प्रश्न उपस्थित होतो. शासनाने प्रथम प्लॅस्टिक पिशव्यावर बंदी आणताना त्याच्यावर पर्याय काढणे आवश्‍यक होते.

  • संपूर्ण प्लॅस्टिक बंदी केल्यावर बाजारपयठांमध्ये नागरिकांचे-ग्राहकांचे हाल होणार आहेत, त्यामुळे प्लॅस्टिक बंदीचा निर्णय चांगला असला तरी पहिल्यांदा यावर शासनाने पर्याय काढावा अशी मागणी काही दुकानदार व लहान-मोठ्या विक्रेत्यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.