प्लॅस्टिक पिशव्यांवरील कारवाई बासनात

दुकानदार, नागरिकांकडून पिशव्यांचा सर्रास वापर

पुणे – प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालत जून महिन्यापासून ज्या धुमधडाक्‍यात महापालिकेने कारवाईला सुरुवात केली, त्यातील हवा आता निघून गेली आहे. दोन-अडीच महिन्यातच कारवाई थंडावली असून, पुन्हा एकदा सर्व दुकानदार, नागरिक यांच्या हातात प्लॅस्टिकच्या पिशव्या सर्रास दिसू लागल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जूनमध्ये महापालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाईला सुरुवात केली होती. त्या महिन्यात प्लॅस्टिक पिशव्यांचे विक्रेते, त्यांचे गोडावून आणि रस्त्याने प्लॅस्टिक पिशवी घेऊन चालणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांच्याकडील टनांनी माल महापालिकेने जप्त केला. नागरिकांवर थेट कारवाई करायची नाही म्हणून त्यांना दंड न आकारता हातातील पिशवी जप्त करण्याचे आदेश दिले गेले. परंतु, काहीच दिवसांत ही कारवाई थंडावली आहे.

एवढेच नव्हे तर घरात प्लॅस्टिक पिशव्यांची साठवणूक केली असेल तर, त्या पिशव्या महापालिकेकडे जमा करण्यासाठी आरोग्य कोठ्यांमध्ये सोय करण्यात आली होती. जप्त केलेले प्लॅस्टिक पिशव्या ठेवण्यासाठी महापालिकेकडे अजिबातच जागा नव्हती. असे असतानाही ही कारवाई केली जात होती. आता मात्र सगळ्यांच्या हातात सर्रास प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसत आहेत. तसेच, दुकानदार छोटे-मोठे व्यापारी यांच्याकडेही प्लॅस्टिकच्या मोठ्या पिशव्या दिसू लागल्या आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार, प्लॅस्टिक पिशव्यांवर कोणत्या कंपनीने त्या उत्पादित केल्या आणि रिसायकलींगसाठी त्या कोठे पाठवायच्या त्याचा पत्ताही त्यावर नमूद करणे आवश्‍यक आहे. मात्र, अशा पिशव्या बाजारात अजूनही वापरात आणल्या गेल्या नाहीत. गणेशोत्सवाच्या आणि मुळातच उत्सवाच्या काळात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री होत असते. अशावेळी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र, महापालिकेकडून अद्याप कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.

आठवडाभरात कारवाईला पुन्हा सुरुवात करू, असे घनकचरा विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त सुरेश जगताप यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते. अद्यापही कारवाईला सुरुवात झाली नाही.

दोन सप्टेंबरला न्यायालयाची सुनावणी होणार आहे. मात्र, आम्ही प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्यांवर कारवाई करत आहोतच. नागरिकांच्या हातात पिशवी असेल तर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याला सुरुवात केली जाणार आहे.

– सुरेश जगताप, प्रमुख, घनकचरा विभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)