प्लॅस्टिकबंदी? छे! हा तर निव्वळ “स्टंट’

गोंधळाची स्थिती : दैनंदिन व्यवहारांत पुन्हा उपयोग

पुणे – राज्यभरात लागू असलेल्या प्लॅस्टिकबंदीबाबत कारवाई पूर्णपणे ठप्प असून प्लॅस्टिकने पुन्हा आपले स्थान मिळविले आहे. या बंदीतून किराणा व्यावसायिकांना वगळल्याने, दुकानांमध्ये प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे होत आहे. बंदीनंतर शहरातील प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला होता. तर, दुसरीकडे दैनंदिन व्यवहारांमध्ये राजरोसपणे प्लॅस्टिकचा वापर होत आहे. त्यामुळे ही प्लॅस्टिकबंदी हा निव्वळ “स्टंट’ आहे की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्य सरकारने जूनमध्ये प्लॅस्टिकबंदीची घोषणा केली. त्यानुसार प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि वापर या सर्वांना बंदी घालण्यात आली. या अनुषंगाने अनेक व्यावसायिकांवर कारवाईचा बडगादेखील उगारण्यात आला. मात्र, कोणताही पर्याय न देता, अचानकपणे लागू केलेल्या या बंदीला समाजातील सर्वच स्तरांमधून जोरदार विरोध केला जात होता. त्यातच प्लॅस्टिक बंदी केली, पण त्याच्या विल्हेवाटीसाठी काय उपाययोजना केल्या? अशी विचारणा करत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर या बंदीबाबत सरकार “बॅकफूट’वर आले. त्यामुळेच प्लॅस्टिकबाबतची कारवाई स्थगित करण्यात आली तसेच किराणा व्यावसायिकांना या बंदीतून वगळण्यात आले. प्लॅस्टिकबंदीबाबत सातत्याने बदलणाऱ्या नियमांमुळे व्यावसायिक आणि सर्वसामान्यांत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

प्लॅस्टिक फुलांवरही बंदी आणा
प्लॅस्टिकबंदीमधून प्लॅस्टिकची फुले, सजावटीचे साहित्य यांना वगळण्यात आले आहे. या वस्तूंदेखील पर्यावरणासाठी हानिकारक असतात. त्यामुळे या वस्तूंवरही बंदी टाकावी, अशी मागणी फुलोत्पादक शेतकऱ्यांनी पुन्हा केली आहे. उत्सवाच्या काळात बाजारात या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात होते. नैसर्गिक फुलांच्या तुलनेत ही फुले अधिक स्वस्त असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र ही फुले पर्यावरणासाठी घातक आहेतच, शिवाय व्यापाऱ्यांनादेखील आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचे नुकसान होते हे मान्य आहे. या बंदीचे समर्थनही नागरिक करतात. मात्र, पूर्वसूचना न देता ही बंदी लागू करणे हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. प्लॅस्टिकला पर्यायी व्यवस्था निर्माण करून ही बंदी लागू केली, तर ती जास्त प्रभावी ठरेल.
– सिद्धार्थ शाह, स्थानिक नागरिक.

बहुतांश फुलोत्पादक शेतकरी कर्ज घेऊन फुलांची शेती करत असतात. अशावेळी या प्लॅस्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांच्या मालाला जास्त मागणी मिळत नाही. बहुतांश वेळेला खर्चाइतकी रक्कमदेखील वसूल न झाल्याने मोठा फटका बसतो. त्यामुळेच ही प्लॅस्टिक फुलांवरील बंदी पर्यावर्णपूरक ठरेल. तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत मिळेल.
– नीलेश पाटील, फुल उत्पादक शेतकरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)