#प्रेरणा: दीडशे वर्षांचा “अन्नपूर्णा’ उपक्रम   

संग्रहित छायाचित्र
दत्तात्रय आंबुलकर
 
मनुष्यमात्राला भूक लागणे ही नैसर्गिक क्रिया-प्रक्रिया मानली तर उपाशी मनुष्याची भूक मिटविणे व त्याला अन्न उपलब्ध करून देणे ही सर्वश्रेष्ठ पूजा ठरते. भुकेल्या मनुष्याना दररोज सेवा स्वरूपात अन्न उपलब्ध करून देण्याची पूजा-प्रक्रिया तमिळनाडूच्या वडलूर येथील अन्नपूजा गृहामध्ये गेली 150 वर्षे निरंतर सुरू आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात तमिळनाडूमध्ये स्वामी रामलिंग अरुतस्का वल्लालर नावाचे थोर संत होऊन गेले. त्यांना त्यांचे अनुयायी “वल्लालर’ म्हणूनच संबोधित करीत. स्वामी वल्लावर तत्कालीन संत-महात्मा रामकृष्ण परमहंस, स्वामी दयानंद सरस्वती यांचे समकालीन होते व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्य करीत असत. त्यांचा तमिळनाडूसह दक्षिण भारतात मोठा
शिष्य परिवार होता.
आपल्या शिष्यांना धार्मिक स्वरूपाचे संस्कार व मार्गदर्शन करतानाच “वल्लालर’ स्वामींनी त्यांना गरजूंसह इतरेजनांची भूक मिटविण्यासाठी विशेष व आग्रही मार्गदर्शन केले. परमेश्‍वराच्या इतर पूजा-पद्धतींप्रमाणेच गरजू व भुकेल्यांना अन्न प्रदान करून त्यांची भूक भागविणे हीसुद्धा तेवढीच महत्त्वाची व मानवीय सेवा आहे. यातूनच व लालर स्वामींनी आपल्या शिष्यवर्गाला “अन्नदानम-महादानम’ ही महान शिक्षा-दीक्षा प्रदान केली. त्याचा प्रचार-प्रसार केला. यासाठी वल्लालर स्वामींनी आपल्या धर्मात प्राचीन काळापासून सुरू असणाऱ्या अन्नदानाचे महत्त्व-महात्म्य व त्याचा सर्वकालीन व्यावहारिक प्रयोग-उपयोग नव्याने व नव्या संदर्भासह समजावून सांगितला. आपल्या विचारांना मिळणाऱ्या वाढता प्रभाव व परिणामांमुळे स्वामी वल्लालर यांनी तमिळनाडूमध्ये आपल्या अनुयायांमध्ये “जीव कारुण्य’ ही चळवळ सुरू केली व त्याद्वारे “अन्नदानम्‌-महादानम्‌’ला पूजा स्वरूप प्राप्त करून दिले व 23 मे 1867 रोजी गरीब-गरजूंना भोजन उपलब्ध करून देण्याच्या मानवतावादी उपक्रमाची सुरुवात केली.
स्वामी वल्लालर यांच्या या उपक्रमाला त्यांचे अनुयायी व समाजसेवींचे सुरुवातीपासूनच मोठे सहकार्य मिळाले. अनेकांकडून भोजनासाठी आवश्‍यक अशा वस्तू व साहित्य देणगी स्वरूपात दिले जाऊ लागले. मग स्वामीजींनी सामूहिक पाकगृहाची सुरुवात केली. या स्वयंपाकगृहाला त्यांनी “धर्म सलाय’ म्हणजे “धार्मिक पाकगृह’ असे नाव दिले. समाजाच्या सर्वच स्तरातील गरजूंना भोजन उपलब्ध करून सामाजिक व सहभोजनाच्या प्रगतीशील उपक्रमातून जातीवादाला पहिलेपासूनच फाटा फोडला तो कायमचा.
आज 150 वर्षांनंतर पण स्वामी वल्लालर यांचे “धर्म सलाय’ व त्याद्वारे सुरू असणारे गरजूंच्या भोजनदानाचे काम निरंतर, समाजसेवेच्या भावनेतून व धार्मिक संस्कारांसह सुरूच आहे. आज दिवसातून तीनवेळा गरजू व गरिबांना भोजन उपलब्ध केले जाते. हजो लोक त्याचा रोज लाभ घेतात. हे सारे साधण्यासाठी “धर्म सलाय’मध्ये 21 फूट लांब व 2.5 फूट खोल अशी विशेष भोजनभट्टी तयार करण्यात आली असून त्याठिकाणी निरंतर अग्नी प्रज्वलित ठेवण्यात येऊन त्याद्वारे भोजन तयारी सुरू असते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)