#प्रेरणा : “गो-सफारी’

संग्रहित छायाचित्र...

दत्तात्रय आंबुलकर 

गो पालन व गो संरक्षण हे मुद्दे देशांतर्गत विविध स्तरांवर व विविध पातळींवर चर्चेचे ठरले असतानाच आपल्या वैयक्‍तिक प्रयत्नांतून गोपालनाला उद्यमशीलतेची साथ देतानाच सामाजिक जबाबदारी पार पाडतानाच शहरी सामान्यजनांना बदल आणि विरंगुळा घडवून आणण्याचा यशस्वी उपक्रम राजस्थानच्या जयपूरनजीक साकारला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रणेते आहेत जयपूरचे राधाप्रिय दास. या प्रकल्पाला साकारण्यासाठी त्यांनी “अक्षयपात्र’ या स्वयंसेवी संस्थेचे सहकार्य घेतले आहे हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. “अक्षयपात्र’ ही संस्था शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना माध्यान्हकालीन भोजन देण्याचे काम देशपातळीवर व मोठ्या प्रमाणात करीत असते. मात्र, अशा प्रकारचा गो-पालन प्रकल्पाचे काम संस्थेने प्रथमच हाती घेतले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सन 2016 मध्ये जयपूर आणि परिसरातील विविध गोशाळांमधील सुमारे 500 गाईंचा मृत्यू झाल्यानंतर “अक्षयपात्र’ने याप्रकरणी प्राणी-दयेपोटी काम करण्यास सुरुवात केली. आज अक्षयपात्रच्या राजस्थानमधील विविध गोशाळांमध्ये सुमारे 22000 गाईंचे पालनपोषण करण्यात येत आहे. गो-पालन व गो-संवर्धनाच्या आपल्या याच प्रयत्नातील एक टप्पा म्हणून “अक्षयपात्र’ने जयपूरजवळ हिंगोनिया गोरक्षण प्रकल्प सुरू केला. येथे 500 एकर विस्तीर्ण परिसरातील गोशाळेत 22 एकर जागेत शेती व वृक्षलागवड करून जंगलसदृश वातावरण तयार केले आहे. याच नैसर्गिक परिसरात पर्यटकांना ग्रामीण पार्श्‍वभूमी व गायींच्या सहवासात सैर करण्याची कल्पना साकारण्यात आली आहे.

“अक्षयपात्र’च्या या गो-संरक्षण प्रकल्पाचा खर्च सुमारे 40 लाख रुपये असून प्रकल्पाचे संचालन स्वतः गोभक्त राधाप्रिय दास यांनी समर्पित भावनेने केले आहे. आजमितीस या गोपालन केंद्रातील गाईंची संख्या 300 असून त्यामध्ये देशी वाणाच्या 10 प्रकारच्या गायींच्या प्रत्येकी 30 गायींचा समावेश करण्यात आला आहे.
गोशाळेला जनसामान्यांचे सहकार्य-समर्थन मिळावे व गोपालन केंद्राला भेट देणाऱ्या विविध वयोगटातील नागरिकांसाठी बैलगाडीतील गो-सफारीचे नियोजन करण्यात आले. त्याद्वारे अबालवृद्ध मंडळींना गोशाळेत बैलगाडीची सफर घडविण्यात येते. दिवसभराच्या भेटीच्या दरम्यान येणाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था म्हणून खास ग्रामीण भोजनाचा बेत आयोजित केला जातो. हे भोजन मातीच्या चुलीवर व केंद्र परिसरातील गहू-बाजरी, भाजी यापासूनच तयार केले जाते व त्याला दुग्धजन्य पदार्थांची आवर्जून जोड दिली जाते. हा खाद्य उपक्रम पर्यटकांच्या पसंतीस उतरला आहे.

आपल्या आगामी योजनांच्या संदर्भात राधाप्रिय दास आवर्जून नमूद करतात की जनसामान्यांसाठी गाय ही नेहमीच सदा उपयुक्त ठरली असून त्यामुळेच आम्ही गाईंचा श्रद्धापूर्ण पद्धतीने प्रतिपाळ करतो. आधुनिक संदर्भात व बदलत्या गरजा व अपेक्षांनुरुप “जंगल-सफारी’, “टायगर-सफारी’ प्रमाणेच आम्ही आमच्या गो-संरक्षण केंद्रात काऊ-सफारीची संकल्पना राबविली असून त्याला जनतेच्या समर्थन आणि सहकार्यामुळेच प्रेरणास्पद प्रतिसाद मिळत असून आगामी काळात आपल्या केंद्रातील गाईंची संख्या 10,000 वर नेण्याचा त्यांचा कृतिशील मनोदय आहे. म्हणूनच हा प्रकल्प आता पथदर्शी प्रकल्प म्हणूनही गणला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)