प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या मेहुण्याचा खून करणाऱ्याला जन्मठेप

पुणे – बहिणीशी केलेल्या प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या मेहुण्याचा चाकुने वार करून खून करणाऱ्या भावजीला जन्मठेप आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
अलोक किशोर कांबळे (वय 28, रा. आंबेडकर सोसायटी, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्याने मेहुणा निखिल बाळू कदम (वय 24, रा. येरवडा) याचा खून केला. निखिल याचे वडील बाळू वकील कदम (वय 51) यांनी याबाबत येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 14 डिसेंबर 2014 रोजी रात्री 9.45 च्या सुमारास येरवडा येथील आंबेडकर सोसायटी परिसरातील व्यायाम शाळेसमोर घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील सुरेश गवळी यांनी काम पाहिले. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी रोहित गवळी याची साक्ष महत्त्वाची ठरली. येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश भोसले, कॉन्स्टेबल सुधीर चिकणे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहाय केले. अलोक याने निखिल याची बहिण नेहा हिच्याशी प्रेम विवाह केला होता. यास मयत निखिल आणि फिर्यादी बाळू यांचा विरोध होता. याच कारणावरून निखिल याने अलोक याच्यावर 2013 मध्ये वार केले होते. तर त्यापूर्वी 2012 मध्ये अलोक याच्या वडिलांना मारहाण केली होती. घटनेच्या दिवशी निखिल आणि अलोक एका वरातीमध्ये होते. निखिल मित्रांसह गप्पा मारत उभारला होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून अलोक याने निखिल याच्यावर चाकुने वार करून त्याचा खून केला. त्यावेळी प्रत्यक्षदर्शी रोहित याने निखिल याला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हातावर चाकू लागून तो जखमी झाला होता. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) नुसार जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड, तर भादवी कलम 324 (गंभीर मारहाण) नुसार 1 वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)