प्रेमात वाटेकरी नकोच

विवाहाच्या पहिल्या काही दिवसांत जोडीदारांपैकी एकाला किंवा दोघांनाही आपला निर्णय चुकला, असे वाटत राहते. मग लहान लहान विषयांचे इश्‍यू केले जातात आणि बघता बघता हे नवं नातं विघटनाच्या उंबरठ्यापर्यंत येवून थांबतं. पण एकमेकांना समजून घ्यायला वेळ दिला आणि थोडा वेळ एकमेकांना समजून घेण्यासाठी दिला, तर अशी टोकाचा निर्णय घेण्याची वेळच येत नाही. मात्र, त्यासाठी पेशन्स मात्र हवा; एकाकडे नाही, दोघांकडेही…

केतन आणि सायली दोघेजण समुपदेशनासाठी भेटायला आले होते. ते स्वतःहून आले नव्हते तर घरच्यांनी खूपच जबरदस्तीने त्यांना समुपदेशनासाठी पाठवले होते. दोघांना इथे यायचेच नव्हते. ते नाईलाज म्हणून इथे आले होते, हे त्यांनी आल्या आल्याच स्पष्ट सांगितले. त्या दोघांबरोबर केतनचे वडीलदेखील आले होते. ते दोघेही त्यांच्यावर चिडले होते. पण त्यांच्यासमोर आणखी काही बोलण्याची दोघांची कदाचित हिम्मत नव्हती म्हणून दोघे गप्प बसले होते.

केतनच्या वडिलांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी प्रथम स्वतःची ओळख करून दिली. ते एका सरकारी कार्यालयातून एका उच्च पदावरून निवृत्त झाले होते. केतन हा त्यांचा मुलगा तर सायली त्यांची सून. त्या दोघांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले.

सुरुवातीचे वर्ष छान गेले. पण नंतर दोघांमधले वाद हळूहळू वाढायला लागले. वादाचे रूपांतर भांडणात होत गेले आणि आता घरातल्या कोणालाही विश्‍वासात न घेता दोघांनी परस्पर घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. सायली माहेरी निघून गेली. तिच्या घरच्यांना तर हे सारे ऐकून धक्काच बसला. ते तिला घेऊन केतनच्या घरी आले. तेव्हा केतनच्या घरच्यांना सर्व कळले आणि त्यांनही मोठा धक्का बसला.

त्या दोघांची भांडणं होत असली तरी ते या निर्णयापर्यंत जातील असं कोणालाच वाटलं नव्हतं. दोन्ही घरातील माणसे त्यांच्या या निर्णयाने घाबरली होती व नाराजही झाली होती. त्यांनी दोघांना खूप समजावले पण तरीही केतन आणि सायली आपल्या निर्णयावर ठाम होते. बरेच प्रयत्न करूनही ते दोघे ऐकायला तयार नाहीत म्हणून शेवटचा उपाय म्हणून त्यांना समुपदेशनासाठी नेण्याचे सर्वांनी ठरवले आणि म्हणूनच केतनचे वडील त्यांना घेऊन आले होते.

या सत्रांदरम्यान दोघांनाही बोलण्यात विशेष रस नव्हता त्यामुळे या सत्रात तिघांकडूनही केवळ महत्त्वाची अधिक माहिती घेतली व पुढच्या सत्रांसाठी स्वतंत्रपणे भेटण्यास सांगितले केतन सुरुवातीला तयार नव्हताच पण वडिलांमुळे येण्यास तयार झाला. त्यानंतरचे प्रथम सत्र सायलीबरोबर घेण्याचे ठरले.

सायली सत्रासाठी आली. ती आल्यावर तिने प्रथम स्वतःची ओळख करून दिली. सायली आणि केतन दोघेही आय.टी. क्षेत्रात काम करतात. दोघांचे लग्न रितसर पाहण्याचा कार्यक्रम होऊन ठरले. लग्न ठरल्यापासून महिन्याभरातच त्यांचे लग्न झालेही. किमान 15 दिवस छान फिरून आल्यावर दोघांचे वैवाहिक आयुष्य जबाबदाऱ्यांसह खऱ्याअर्थाने सुरू झाले आणि मग एकमेकांच्या स्वभावातलं उन्नीस-बीस दोघांना कळायला लागलं आणि मग हळूहळू वाद व्हायला लागले.

सायलीच्या सांगण्यानुसार तिला स्वतःला घर, स्वतःची खोली स्वच्छ नीटनेटकी ठेवायला आवडते. एकही वस्तू इकडे तिकडे झालेली तिला अजिबात खपत नाही आणि केतन बरोबर याच्या उलट स्वभावाचा. त्याचा टॉवेल, शर्ट-पॅंट वस्तू कशाही पडलेल्या असतात. सकाळी नुसती शोधाशोध आणि चिडाचिड, आरडाओरड. तो चिडतो म्हणून आई धावत येऊन त्याला सगळं हातात देतात. मला हे अजिबात आवडत नाही.

याबरोबर त्याच्या आणखी दोन तक्रारी म्हणजै पैशांची उधळपट्टी आणि कामांची, जबाबदाऱ्यांची चालढकल.’ त्याचीही तिने अनेक उदाहरणे दिली. पुढील सत्र केतनबरोबर घेतले. त्यातही त्याने सायलीचेच मुद्दे सांगितले. “तिला अति स्वच्छता आवडते. मला ते नाही जमत मग ती चिडते. मी ब्रॅंडेड वस्तू वापरतो मला खूप आवडते. पण तिला ती पैशांची नासाडी वाटते. आणि प्रत्येक काम तिने सांगितले की ताबडतोब झालेच पाहिजे असा तिचा अट्टहास असतो.

मॅडम मला पण ऑफिसची, इतर कितीतरी कामं असतात.हिचं काम प्रत्येकवेळी सांगितल्या सांगितल्या मी कसं करू शकेन. घरच्यांनी किती समजावलं पण ही काहीच “ऍडजेस्ट’ करायला तयार नाही. मग मला पण राग येतो आणि आता तर तिला मुल हवंय म्हणून रोज मागे लागते नुसतं. भंडावून सोडलंय. मी अजून या गोष्टीसाठी अजून कोणत्याच दृष्टीने तयार नाही.’

दोघांच्याही भांडणाचे मुद्दे फार गंभीर किंवा मोठे नव्हते. लग्नाआधी मिळालेला अपुरा वेळ. महत्त्वाच्या विषयांवर असणाऱ्या मोकळ्या, शांत संवादाचा अभाव आमि जोडीदारासाठी ‘Adjustment’ करण्याची नसलेली तयारी यामुळे हे वाद घडत होते. आणखी दोन-तीन सत्रं झाल्यावर नंतरची सत्रे दोघांची एकत्र घेतली व हळूहळू या मुद्‌द्‌यांची त्यांना जाणीव करून दिली. हलूहळू दोघांनाही नक्की बदल कुठे आणि कसा करायचाय ते समजलं आणि हळूहळू त्यांच्यातलं नातं फुलत गेलं.

आता दोघांचाही घटस्फोटाचा विचार मागे पडला असून वैवाहिक नात्यामधले सौंदर्य त्यांना गवसले आहे.
(केसमधील नावे बदलली आहेत.)

मानसी चांदोरीकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)