प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणीवर झाडली गोळी

देवळालीत भल्या पहाटे तरुणाचा थरार; स्वतःच्याच डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्येचाही प्रयत्न

राहुरी विद्यापीठ – देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे आज भल्या पहाटे एका 30 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून 25 वर्षीय तरुणीवर तिच्या घरात घुसून गोळीबार केला. या गोळीबारात ती तरुणी मयत झाल्याचा भास झाल्याने नंतर त्या तरुणाने स्वतःच्याच डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्येचाही प्रयत्न केला. 

दरम्यान, या हल्यात ती तरुणी बालंबाल बचावली असून, तरुणाने झाडलेली गोळी तिच्या डोक्‍याजवळ चाटून गेली आहे. तरुणाची प्रकृती चिंताजनक असून, त्याला उपचारासाठी लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज पहाटे पावणेसहाच्या सुमारास विक्रम रमेश मुसमाडे याने आपल्या मित्रासह त्या तरुणीच्या बंगल्याच्या मागील दरवाज्यातून आत प्रवेश केला. त्यावेळी ती तरुणी स्वयंपाकघरात झाडलोट करत होती. अचानक समोर आलेल्या विक्रम याने “तू माझ्यावर प्रेम का करत नाही?, अशी विचारणा केली. त्याचवेळी तरुणीची लहान बहीण तेथे आली. त्यामुळे विक्रमने तिलाही मारहाण केली. त्यावेळी संबंधित तरुणीने “माझे तुझ्यावर प्रेम नाही,’ असे विक्रमला स्पष्टपणे सांगितले.

तरुणीचा  हा नकार सहन न झाल्याने विक्रमने कंबरेला लावलेली बंदूक काढून तिच्या डोक्‍याला लावून, तुला जीवे मारून टाकतो, असे म्हणाला. यावेळी तरुणीच्या आजीने विक्रमला जोराचा धक्का दिला. त्याच वेळी बंदुकीमधून गोळी सुटलेली तरुणीच्या डोक्‍याला चाटून गेली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने जखमी अवस्थेत आपल्या चुलत्यास मोबाईलवरुन घटनेची माहिती दिली. याचवेळी गोळीबारात ती तरुणी गतप्राण झाल्याचा विक्रमला भास झाला.

त्यानंतर त्याने स्वतःच्या डोक्‍याला बंदूक लावून गोळी झाडली. त्यात तो गंभीर जखमी झाला. या गोळीबाराने स्वयंपाकघरात रक्ताचे थोरोळे साचले होते. बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान घटनेची माहिती समजताच विक्रमच्या मित्रांनी घटनास्थळी येऊन विक्रमला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथकाबरोबरच अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल, सहायक फौजदार पोपट टिककल, पोलीस नाईक वाल्मीक पारधी, पोलीस कॉन्स्टेबल गणेश फाटक आदी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. दरम्यान, या गंभीर घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसर भयचकित आहे.

पोलिसांत दोन महिन्यांपूर्वीच तक्रार
हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीच्या नातलगांनी संबंधित हल्लेखोर तरुण त्रास देत असल्याबाबतची तक्रार दोन महिन्यांपूर्वीच राहुरी पोलीस ठाण्यात तसेच सायबर क्राइम विभागाकडेही नोंदवली होती. मात्र, संबंधित तरुणाविरोधात पोलिसांनी योग्य ती कारवाई वेळीच केली नाही. त्यामुळे आज अनर्थ घडला. हल्ल्यासाठी तरुणाने वापरलेली बंदूक आधुनिक बनावटची असल्याचे सांगितले जाते. ही बंदूक त्याच्याकडे आली कुठून? याचाही तपास होण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.