प्रीतिसंगमावर अधिकाऱ्यांची बोट बुडवण्याचा प्रयत्न

कराड – राज्यभरातील सर्वपक्षीय पंचायत समिती सदस्य बुधवारपासून येथील प्रीतिसंगम परिसरात साखळी उपोषणाला बसले होते. परंतु, एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने आंदोलनाची दखल न घेतल्याने इशारा दिल्यानुसार महिला, पुरूष मिळून सुमारे साठ सदस्य शुक्रवारी दुपारी चार वाजता पाण्यात उतरले. त्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी अधिकारी बोटीतून आंदोलकांपर्यंत गेल्यानंतर आंदोलकांनी त्यांची बोटीला घेराव घालून बोट पाण्यात बुडविण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. अखेर सर्व अधिकाऱ्यांना बोटीतून पाण्यात उतरावे लागले.

दरम्यान, तीन तासांनंतर आ. बाळासाहेब पाटील यांनी प्रधान सचिवांशी चर्चा घडवून आणल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. पंचायत समिती सदस्यांच्या अधिकाऱ्यांवर गदा आणून पंचायतराज व्यवस्था मोडीत काढण्याच्या शासनाच्या सुरू असलेल्या धोरणाविरोधात राज्यातील सर्वपक्षीय पंचायत समिती सदस्यांनी संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीच्यावतीने बुधवारपासून येथील प्रीतिसंगम परिसरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. उपोषणाला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. आनंदराव पाटील, ऍड. उदयसिंह पाटील यांनी भेट दिली होती. मात्र, प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही. त्यामुळे सदस्यांनी तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांना गुरूवारी निवेदनाद्वारे शुक्रवारी जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुक्रवारी साखळी उपोषणाचा शेवटचा दिवस होता. चारपर्यंत प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास इशारा दिल्याप्रमाणे आंदोलन करण्यावर सर्वजण ठाम होते. तरीही एकही अधिकारी आंदोलनाकडे न फिरकल्याने सर्व सदस्य दुपारी चारनंतर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गेले. तेथे अभिवादन करून सर्वजण नदीपात्रात उतरले. त्यामध्ये महिला सदस्यांचाही लक्षणीय सहभाग होता. सदस्य खरोखर पाण्यात उतरल्याने पोलीस प्रशासनाची तंतरली. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर जादा कुमक नदीपात्राकडे आली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाडही दाखल झाले.

मागोमाग फायर ब्रिगेडची गाडी आणि जवानही आले. या आंदोलनाची माहिती तहसीलदार, प्रांतांना दिल्यानंतर तहसीलदार, गटविकास अधिकारी आंदोलनाकडे आले. पोलीस निरीक्षक, तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आंदोलक सदस्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली. मात्र, नदीपात्राबाहेर येण्यास नकार देत चर्चा करायची असल्यास पाण्यात उतरून आमच्यापर्यंत येण्यास सांगितले. त्यामुळे सर्वजण तेथील बोटीतून आंदोलक सदस्यांपर्यंत गेले. त्यावेळी सर्व सदस्यांनी आणि अधिकाऱ्यांच्या बोटीला घेराव घालून बोट हलविण्यास सुरूवात केली. त्यामुळे बोट एका बाजूला कलली. यामुळे काही काळ खळबळ उडाली.

बोट पाण्यात पलटी होण्याच्या अवस्थेत असतानाच सर्व अधिकाऱ्यांनी पाण्यात उतरण्याची तयारी दर्शवून सर्वजण पाण्यात उतरले आणि सदस्यांशी चर्चा केली. मात्र, प्रांताधिकारी आल्याशिवाय पाण्यातून न हलण्याची भूमिका त्यांनी घेतली. नंतर प्रांताधिकारीही पोहोचले. तेही पाण्यातून चालत सदस्यांपर्यंत गेले. मात्र, सदस्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.

अधिकाऱ्यांनी ना. मुंडे यांच्या पी. ए. शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. या सर्व प्रकारात दोन-अडीच तास उलटले. मात्र, एकही सदस्य पाण्यातून हलला नाही. अखेर पावणे आठच्या सुमारास आ. बाळासाहेब पाटील आणि ऍड. उदयसिंह पाटील तेथे आले. आ. पाटील यांनी प्रधान सचिवांशी संपर्क साधून सदस्यांशी चर्चा घडवून आणली. येत्या 5 फेब्रुवारीपर्यंत ना. पंकजा मुंडे यांच्याशी बैठक आयोजित करण्याची ग्वाही त्यांनी दिल्यानंतर सदस्य पाण्यातून बाहेर आले. त्यानंतर महसूल आणि पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्‍वास टाकला.
पोलिस दलातील दोघांना राष्ट्रपती पदक दोघांनीही उल्लेखनिय कामगिरी केल्याने त्यांना राष्ट्रपदी पदकाने गौरवण्यात आले आहे. पदकप्राप्त दोघांचेही जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख,अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील,कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक विजय कुंभार, सर्जेराव गायकवाड यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)