प्रा. स्टीफन हॉकिंग यांच्या सिद्धांताला आव्हान देणारे संशोधन निष्कर्ष प्रसिद्ध

 

कृष्णपदार्थ खरंच विश्‍वनिर्मीतीच्या काळातील कृष्णविवरांपासून बनलेला आहे का?
आयुकातील डॉ. सुहृद मोरे आणि डॉ. अनुप्रिता मोरे हे शास्त्रज्ञ या गटातील सदस्य 
प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि 2 – जपान, भारत आणि अमेरिका या देशांतील एका संयुक्त संशोधन गटाने काढलेल्या निष्कर्षामुळे आता प्रा. स्टीफन हॉकिंग यांनी काही दशकांपूर्वी मांडलेल्या,” विश्वनिर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील कृष्णविवर हे विश्वातील
कृष्णपदार्थच्या निर्मितीबद्दल कारणीभूत’ असल्याच्या सिद्धांताला आव्हान मिळाले आहे. या संशोधन गटाने
कृष्णपदार्थ व विश्वनिर्मितीच्या सुरुवातीच्या काळातील कृष्णविवरांबद्दल एक संशोधन निबंध जागतिक दर्जाच्या “नेचर ऍस्ट्रॉनॉमी’ संशोधन नियतकालिकात 1 एप्रिल 2019 रोजी प्रसिद्ध केला आहे. पुण्यातील आयुकामध्ये
कार्यरत असलेले डॉ. सुहृद मोरे आणि डॉ. अनुप्रिता मोरे हे शास्त्रज्ञ या गटातील सदस्य आहेत.

संपूर्ण विश्वामध्ये कृष्णपदार्थ आता जवळपास 85% एवढ्या प्रमाणात आहे. आजपर्यंत कृष्णपदार्थ कण शोधण्याचे
अनेक प्रयत्न झाले. त्यातील बरेच प्रयत्न भूमिगत प्रयोग स्वरूपात होते. अनेक प्रयोगातून सुद्धा कृष्णपदार्थ शोधणे शक्‍य
झाले नाही. सन 1971 मध्ये डॉ. स्टीफन हॉकिंग यांनी आदिम कृष्णविवर हे विश्वाच्या निर्मितीनंतरच्या
सुरुवातीच्या काळात जन्माला आले असावेत आणि यापासून सर्व कृष्णपदार्थाची निर्मिती झाली असावी, असा
सिद्धांत मांडला होता. इतर सर्व प्रयोगातून कृष्णपदार्थाचे अस्तित्त्व सिद्ध करण्यात अपयश आल्यामुळे, प्रा. हॉकिंग
यांच्या सिद्धांताला कठोर निकषांच्या प्रयोगातून तपासून पाहण्याची उत्सुकता वैज्ञानिक समुदायामध्ये होती.

या संशोधन गटाने ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग परिणाम या संकल्पनेचा वापर करून अवकाशात असणाऱ्या आदिम कृष्णविवरांचा शोध घेऊन अभ्यास केला. फक्त शक्तिशाली दुर्बिणीच्या साहाय्यानेच दूरस्थ अंतरावरून आणि अवकाशातील ताऱ्याकडून येणाऱ्या प्रकाशामुळे ही विस्तारित (मोठी) प्रतिमा प्राप्त होते. अवकाशातील हे आदिम कृष्णविवर कशी वाटचाल करतात याचा अंदाज घेत या संशोधन गटाने अँड्रोमेडा दीर्घिकेची हवाई बेटावरील जपानी सुबारू दुर्बिणीच्या साहाय्याने संपूर्ण रात्रभर अनेक निरीक्षणे नोंदवली.

सुबारू दुर्बिणीचे प्राथमिक भिंग हे 8.2 मीटर व्यासाचे आहे ज्यामुळे संपूर्ण अँड्रोमेडा दीर्घिकेची
निरीक्षणे नोंदवणे शक्‍य झाले. सुबारू दुर्बिणीच्या साहाय्याने नोंदवलेल्या 190 सलग निरीक्षणांमधून संशोधकांना
आदिम कृष्णविवरांमुळे अँड्रोमेडा दीर्घिकेमधील जवळपास एक हजार तारे अधिक प्रकाशमान होण्याची अपेक्षा होती.
परंतु या गटाला याप्रकारचा फक्त एकच नमुना सापडला. त्यामुळे, एकूण कृष्णपदार्थापैकी 1 टक्‍क्‍यापेक्षा कमी प्रमाण
हे आपल्या चंद्राएवढ्या वस्तुमान असलेल्या आदिम कृष्णविवरांपासून बनले आहे, असा निष्कर्ष या संशोधन गटाने मांडला आहे.

संशोधनाचे महत्त्व
डॉ. हॉकिंग यांनी आदिम कृष्णविवरांबद्दल मांडलेल्या सिद्धांताच्या तुलनेत हा निगेटिव्ह रिझल्ट (नकारात्मक निष्कर्ष) म्हणता येईल. यामुळे विश्वाच्या मूलभूत सरंचनेसाठी जबाबदार असणाऱ्या घटकांबद्दल आपल्या ज्ञानात आणखी भर पडली आहे. आता त्याहून महत्त्वाचे म्हणजे या संशोधनाने आदिम काळातील विश्वाच्या भौतिकशास्त्राबद्दल काही गणितीय अटींची परिमाणे सुद्धा निश्‍चित केली आहेत, अशी माहिती आयुकाकडून देण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.