#प्रासंगिक: उथळपणाचा खळखळाट (भाग २)

मिलिंद सोलापूरकर
नवजोतसिंग सिद्धू यांनी एक तर इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात जायलाच नको होते. गेल्यानंतरही त्यांनी तिथे जी मुक्ताफळे उधळली त्या वक्तव्यांना “भारतविरोधी वक्तव्ये’ असेच म्हणायला हवे. कारण पाकिस्तान शांतिप्रक्रियेसाठी तयार असून, भारतच पुढाकार घेत नाही, असा आशय त्यांच्या वक्तव्यांमधून ध्वनित झाला. धोरणात्मक निर्णय सरकार घेते की लष्कर, याचीही माहिती नसलेल्या सिद्धूंच्या बालिश वक्तव्यांमुळे भारताचेच नव्हे तर त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या पक्षाचेही नुकसान झाले आहे. 
या पार्श्‍वभूमीवर, सिद्धू यांची वक्तव्ये किती बेजबाबदारपणाची ठरतात, याचा निर्णय भारतीय जनतेनेच घ्यायचा आहे. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एक फोन केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वनिर्धारित कार्यक्रम नसताना लाहोरला गेले, शरीफ यांच्या घरी गेले, या बाबी सिद्धू विसरले की काय? त्यावेळी पंतप्रधान मोदी हे अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर होते. त्यांनी फोनवरून नवाज शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तेव्हा शरीफ म्हणाले, “”मी लाहोरमध्येच आहे. भारतात परतताना येथे येऊन जा.” मोदी लगेच लाहोरला गेले. उभय देशांदरम्यान विश्‍वासाचे वातावरण संवर्धित करण्यासाठी यापेक्षा मोठे पाऊल कोणते असू शकते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथग्रहण समारंभाला दक्षिण आशियातील सर्व देशांच्या नेत्यांबरोबरच नवाज शरीफ यांनाही आमंत्रण दिले होते. पाकिस्तानबरोबर सर्वंकष वाटाघाटी करण्यासाठीची पार्श्‍वभूमी तर तेव्हाच तयार झाली होती. पॅरिस आणि उफामध्येही नवाज शरीफ आणि मोदी यांच्यात चर्चा झाली होती. भूतकाळात तर भारताने पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी आणि शांततेसाठी असंख्य प्रयत्न केलेच आहेत; परंतु मोदी यांच्या कार्यकाळातच भारताने इतक्‍या वेळा पुढाकार घेतला आहे. परंतु पाकिस्तानने रक्तपाताचा मार्ग सोडायचाच नाही, असे ठरवल्यावर शांततेसाठी चर्चा होऊच कशी शकते? सिद्धू सांगत आहेत की, गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त कर्तारपूर मार्ग खुला करण्याची बाजवा यांची इच्छा आहे.
अशा प्रकारे दोन्ही देशांदरम्यानचा एखादा मार्ग खुला करण्याचा निर्णय सरकार करणार की लष्कर? लष्करप्रमुख असा निर्णय घेऊ शकत नाहीत, एवढी माहिती नसलेली व्यक्ती इतकी वर्षे राजकारणात काय करते आहे, असाच प्रश्‍न कुणालाही पडेल. यावरून सिद्धू यांनी उलट एक गोष्ट ओळखायला हवी होती. ती म्हणजे, यापुढे पाकिस्तानातील महत्त्वाचे निर्णय, विशेषत्त्वाने परराष्ट्र धोरण आणि संरक्षण विषयातील निर्णय तेथील लष्करच घेईल आणि इम्रान खान केवळ त्यावर सरकारचे शिक्कामोर्तब करतील.
पाकिस्तानात जेवढे प्रेम घेऊन आपण आलो, त्यापेक्षा शतपटीने अधिक प्रेम आपण सोबत घेऊन जात आहोत, असेही सिद्धू म्हणाले. “”खान साहेबांना मी ओळखतो. शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते नक्की काम करतील. भारताने केवळ सुरुवात करायची आहे,” असे विधान करताना सिद्धू हेही विसरले की, इम्रान खान जेव्हा निवडून आले, त्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी भारताचा उल्लेख सर्वांत शेवटी केला होता. कॉंग्रेसच्या नेत्यांनी सिद्धू यांच्या वक्तव्यावर सारवासारवीचे अनेक प्रयत्न केले; मात्र सिद्धू यांनी कॉंग्रेससाठीच मोठी विचित्र अडचण निर्माण करून ठेवली आहे, हे कॉंग्रेस नेतेही ओळखून आहेत. खरे तर पाकिस्तानात सिद्धू यांनी न जाणे, यातच शहाणपण होते.
इम्रान खान यांच्याप्रमाणे तेही क्रिकेटपटू आहेत, एवढ्यावरून लगेच पाकिस्तानात जाण्याचे काही कारण नव्हते. निमंत्रण तर कपिल देव आणि सुनील गावस्कर यांनाही होते. पण ते दोघेही गेले नाहीत. निमंत्रण आल्यावर गावस्कर यांना त्याविषयी विचारले असता, “”आधी सरकारला विचारेन; मग निर्णय घेईन,” असे उत्तर त्यांनी दिले होते. अर्थात, निमंत्रण मिळाल्यानंतर पाकिस्तानात जाण्यापासून सरकार कुणालाच रोखू शकत नाही. परंतु आज गावस्कर सच्चे भारतीय मानले जात आहेत तर सिद्धू यांच्याविषयी सर्वत्र वाईटच बोलले जात आहे.
एक भारतीय या नात्याने पाकिस्तानात जाण्याचा सिद्धू यांचा निर्णयच चुकीचा होता. त्यातही पाकिस्तानच्या भूमीवरून पाकिस्तानला अनुकूल आणि भारताला प्रतिकूल वक्तव्ये करणे तर मूर्खपणाचेच होते. त्यांच्यामुळे भारताचे नुकसान झालेच आहे; परंतु त्यांनी स्वतःची आणि स्वतःच्या पक्षाचीही हानी करून घेतली आहे. इम्रान खान यांना पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा का दिल्या, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. परंतु तो एक राजनैतिक शिष्टाचाराचा भाग आहे. भूतकाळ कसाही असला तरी भारत शांततापूर्ण संबंधांसाठी तयार आहे, असा संदेश या शुभेच्छांद्वारे जगाला दिला गेला. परंतु यानंतर मात्र पाकिस्ताननेच पुढाकार घेतला पाहिजे, हे जाहीर करण्यासाठीच मोदींनी फोनवरून खान यांना दिलेल्या शुभेच्छा सार्वजनिक करण्यात आल्या. सिद्धूंनी पाकिस्तानात जी बडबड केली, त्याच्याशी याची तुलना कशी होऊ शकेल?
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)