#प्रासंगिक: उथळपणाचा खळखळाट (भाग १)

मिलिंद सोलापूरकर
नवजोतसिंग सिद्धू यांनी एक तर इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात जायलाच नको होते. गेल्यानंतरही त्यांनी तिथे जी मुक्ताफळे उधळली त्या वक्तव्यांना “भारतविरोधी वक्तव्ये’ असेच म्हणायला हवे. कारण पाकिस्तान शांतिप्रक्रियेसाठी तयार असून, भारतच पुढाकार घेत नाही, असा आशय त्यांच्या वक्तव्यांमधून ध्वनित झाला. धोरणात्मक निर्णय सरकार घेते की लष्कर, याचीही माहिती नसलेल्या सिद्धूंच्या बालिश वक्तव्यांमुळे भारताचेच नव्हे तर त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या पक्षाचेही नुकसान झाले आहे. 
माजी क्रिकेटपटू आणि आताचे राजकीय नेते नवजोतसिंग सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी पाकिस्तानात जाणे आणि तेथील त्यांचे वर्तन या दोन्ही गोष्टींवरून सध्या वाद उफाळला आहे. हा वादाचा विषय होईल, अशी आधीपासूनच शंका होती. ज्या दिवशी त्यांना इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी बोलावणे आले, त्या दिवशी त्यांनी दर्शविलेला उत्साहच असा होता की, त्यांच्याकडे पुरेशी परिपक्वता नाही, हे त्यावरून स्पष्ट होत होते. पंजाब सरकारमधील ते एक मंत्री आहेत. या राज्यात काही वर्षांपूर्वी पाकपुरस्कृत दहशतवादाने अक्षरशः थैमान घातले होते.
असंख्य लोकांच्या बलिदानानंतर पंजाबात शांतता प्रस्थापित करण्यात आपल्याला यश आले होते. याच पंजाबातील पठाणकोट शहरात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांना या हल्ल्यामुळे खीळ बसली होती. भ्रष्टाचारप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जेव्हा भारताशी संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू केली, तेव्हाच त्यांच्याविरुद्ध कारस्थाने सुरू झाली.
पठाणकोट हल्ल्यानंतर शरीफ म्हणाले होते की, भारताकडे जेवढे पुरावे असतील, ते पाकिस्तानकडे सुपूर्द करावेत. आम्ही चौकशी करून दोषींना शिक्षा देऊ. भारताने पुरावे पाठविले. शरीफ यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तपास करण्यासाठी एक पथकही पठाणकोटला पाठविले आणि जिथे हल्ला झाला होता, त्या वायुसेनेच्या तळाची पाहणी या पथकाने केली. मात्र, त्यानंतर लगेच पाकिस्तानातील वातावरण पूर्णपणे बदलले.
नवाज शरीफ आज तुरुंगात आहेत, त्याची अनेक कारणे आहेत. परंतु भारताबरोबर संबंध सुधारल्यास आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रात सहकार्य करण्यात पाकिस्तानचे हित आहे, याचे त्यांना आलेले भान, हेही त्यांच्या तुरुंगवासामागील एक प्रमुख कारण आहे. पाकिस्तानातील निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन मुद्‌द्‌यांच्या संदर्भात सतत उल्लेख होत होता. एक म्हणजे, मोदी भारताला जो आकार देत आहेत, भारताला जगात जी प्रतिष्ठा मिळवून देत आहेत, तशीच प्रतिष्ठा पाकिस्तानला मिळायला हवी. प्रचाराचा दुसरा मुद्दा असा होता की, पंतप्रधान मोदी हे शरीफ यांचे मित्र आहेत. भारताशी गुप्त करार करून शरीफ यांनी पाकिस्तानचे हित धोक्‍यात आणल्याचा आरोप प्रचारादरम्यान करण्यात येत होता. पाकिस्तानी लष्कर आणि न्यायपालिकेचा एक गट तयार झाला आणि नवाज यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आणून इम्रान खान यांना पुढे आणण्याचा निर्णय झाला.
अर्थात, भारताशी संबंध सुधारायचे आहेत, असे वक्तव्य पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनीही केले होते; मात्र तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी जे काही केले आहे, त्यामुळे संबंध सुधारणे तर दूरच. उलट ते अधिक बिघडले असून, तणाव वाढला आहे. या सर्व बाबींचे ज्ञान सिद्धू यांना आहे की नाही, याचीच शंका येते. सिद्धू यांनी बाजवा यांची चक्क गळाभेट घेतली. अर्थात, हस्तांदोलन केल्यानंतर गळाभेट घेण्यासाठी बाजवा यांनीच पुढाकार घेतलेला असू शकतो. “”आता तेच मिठी मारायला आले, तर मी त्यांना कसे अडवणार?” असे जर सिद्धू यांनी सांगितले असते तर भाग वेगळा होता; पण सिद्धू यांनी तर बाजवा यांचा उल्लेख “शांतिपुरुष’ असा केला.
“पाकिस्तानला शांतता हवी आहे,’ असे बाजवा यांनी सिद्धू यांना सांगितले म्हणे! परंतु “शांतता प्रस्थापित करणे ही पाकिस्तानचीही जबाबदारी आहे,’ असे सिद्धू एक भारतीय म्हणून त्यांना सांगू शकले असते. “”तुम्ही पाकिस्तानातून दहशतवाद्यांची घुसखोरी बंद करा, नियंत्रणरेषेवरील गोळीबार बंद करा. शांतता आपोआप प्रस्थापित होईल,” असेही ते ठणकावून सांगू शकले असते. अशांतता आणि तणावास पाकिस्तानच कारणीभूत आहे, हे सिद्धू यांना जणू माहीतच नाही, असे त्यांच्या बोलण्यावरून वाटले.
सिद्धू हे असे एकमेव भारतीय नेते असतील, ज्यांना खान साहेब (इम्रान खान) जे बोलले ते खरे वाटले. “”खान साहेब म्हणातात, भारताने एक पाऊल पुढे टाकल्यास पाकिस्तान दोन पावले टाकेल. आता आपण सर्वांनी आपल्या (भारत) सरकारला चर्चेच्या मार्गाने एक पाऊल टाकण्यास उद्युक्त केले पाहिजे,” असे वक्तव्य पाकिस्तानच्या भूमीवरून करणारा हा एकमेव भारतीय नेता असेल. सिद्धू यांचे हे विधान मुळातच भारतविरोधी ठरते. कारण भारताने शांततेच्या दृष्टीने कधी पुढाकार घेतलाच नाही आणि पाकिस्तान जणूकाही चर्चेसाठी तयारीतच आहे, असा याचा अर्थ होऊ शकतो. पाकिस्तानी माध्यमे सिद्धूंची ही बेजबाबदार मुक्ताफळे सातत्याने प्रसिद्ध करीत राहणार, यात शंकाच नको. पाकव्याप्त काश्‍मीरच्या कठपुतळी राष्ट्रपतींच्या शेजारी सिद्धू यांना कदाचित जाणूनबुजून बसविण्यात आले होते.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)