प्राप्तीकराच्या छाप्यांमध्ये 14 कोटी रुपयांची रोकड जप्त

कर्नाटक, आंध्र आणि पंजाबमध्ये कारवाई 

नवी दिल्ली – देशभरात रोखीची चणचण असताना प्राप्तीकर विभागाने देशभरात 14 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. रोख रक्कम साठवून ठेवली असल्याच्या संशयावरून प्राप्तीकर विभागाने देशात अनेक ठिकाणांवर छापे घालून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. यामध्ये आगामी काळात विधानसभेच्या निवडणूका होत असलेल्या कर्नाटकचाही समावेश आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या छाप्यांमध्ये एकूण 14.48 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. ही रक्कम प्रामुख्याने 2 हजार आणि 500 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात होती, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

कर्नाटकातील निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्या कंत्राटदारांना यावर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान कंत्राटे दिली गेली अशा महत्वाच्या कंत्राटदारांवर हे छापे घालण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात घातलेल्या छाप्यांमध्ये 6.76 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. कारवाई दरम्यान सापडलेल्या बेनामी लॉकरमध्ये ही रक्कम होती. म्हैसूर आणि बेंगळूरुमधील सुमारे डझनभर कंत्राटदारांवर ही कारवाई केली गेली. योग्य हिशोब न ठेवल्याबद्दल काही ठिकाणी तपास केला गेला होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकमध्ये निवडणूक जाहीर झाल्यापासून तेथील कारवाईत आतापर्यंत 10.62 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय तेथे 1.33 कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

हैदराबादेत प्राप्तीकर विभागाकडून दोन बांधकाम व्यवसायिकांवर घातलेल्या छाप्यात 5.10 कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त करण्यात आली. त्याचप्रमाणे पंजाबमधील खन्ना जिल्ह्यात पशु खाद्य उत्पादन आणि विक्री करणाऱ्या गटावर छापा घालून 2.62 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि 66.49 लाख रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)