“प्राधिकरण बझार’मधील गाळे वाटपाला अखेर मुहूर्त

भोसरी – इंद्रायणीनगर मधील दोन वर्षांपासून धूळखात पडून असलेल्या प्राधिकरण बझारमधील गाळे वाटपाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. महापालिका लिलाव पद्धतीने आरक्षणनिहाय गाळे वाटप करणार आहे.

प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 2 भोवताली असणाऱ्या ओसाड माळरानावर देशातील विविध राज्यातून व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना इंद्रायणीनगरमध्ये भाजीमंडईची समस्या भेडसावत होती. दरम्यान 2012 मध्ये स्थानिक नगरसेवक संजय वाबळे यांनी भाजी मंडईच्या कामाला मंजुरी मिळवून घेतली. 2300 चौरस मीटर जागा भाजी मंडईसाठी आरक्षित करण्यात आली. नवीन प्राधिकरण बझार या संकल्पनेवर आधारीत या कामासाठी सुमारे सव्वा दोन कोटींची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. सुरुवातीला प्राधिकरणाच्या या कामासाठी ठेकेदार निविदा भरण्यास अनुकूल नव्हते. तीन वेळा मुदतवाढ देऊन देखील प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त राजीव जाधव व प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव यांच्याशी चर्चा करून महापालिकेच्या इतर ठेकेदारांना कामाची निविदा भरण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानंतर निविदा प्रक्रिया मार्गी लागली.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भाजीमंडईच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. 2015 च्या अखेरीस प्रत्यक्षात भाजी मंडईचे बांधकाम सुरू झाले. प्राधिकरणाकडून भाजी मंडईचे महापालिकेकडे हस्तांतरण देखील झाले आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागली. फेब्रुवारी 2017 मध्ये महापालिकेत सत्ता बदला झाला. श्रेयवादामध्ये भाजी मंडईकडे कानाडोळा करण्यात आला. परिणामी भाजी मंडईची इमारत 2 वर्षांपासून धूळ खात पडून आहे.

नवीन भाजीमंडई इमारत प्राधिकरणाकडून पुढील देखभाल व दुरुस्तीसाठी महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाने ताब्यात घेण्यास टाळाटाळ केली. मागील 2 वर्षामध्ये तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे व सद्याचे विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे 10-15 स्मरणपत्रे देऊन भाजीमंडई मधील गाळेवाटप प्रक्रिया तातडीने राबविण्याची मागणी स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी केली. अखेर महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत लिलाव पद्धतीने गाळे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

7 मार्चला होणार लिलाव
प्राधिकरण बझारमध्ये यामध्ये एकूण 90 गाळे, स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रशस्त चारचाकी व दुचाकी वाहनतळ व इमारतीमध्ये सौरऊर्जेवर चालणारे विद्युत दिवे आदी सुविधा आहेत. महापालिकेच्या भूमि जिंदगी विभागामार्फत येत्या 7 मार्चला लिलाव पद्धतीने गाळे वाटप करण्यात येणार आहेत. मासुळकर कॉलनीतील रंगास्वामी पिल्ले सभागृहात दुपारी तीन वाजता लिलाव होईल. यामध्ये 72 भाजीपाला तर 13 फळ विक्रीचे गाळे आहेत. अंध-अपंगासाठी, अनुसूचित जाती-जमाती, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट, खुला गटासाठी गाळे राखीव आहेत. 5 वर्षे कालावधीसाठी भाडेतत्वावर, महापालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम देणाऱ्यास गाळे दिले जाणार आहेत, अशी माहिती स्वीकृत सदस्य संजय वाबळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)