प्राधिकरणाच्या भूखंडासाठी मोजणार 6.17 कोटी!

– शिक्षण समितीचा प्रस्ताव : शैक्षणिक वापरासाठी अधिमूल्य भरणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण पेठ क्रमांक 30 मधील प्राथमिक शाळा क्रमांक एकचा भूखंड महापालिका प्रशासनाकडे शैक्षणिक वापरासाठी हस्तांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी 6 कोटी 17 लाख 53 हजार 620 रुपये इतके अधिमूल्य प्राधिकरणाकडे भरण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका शिक्षण समितीने प्राधिकरण हद्दीत चिंचवड येथील पेठ क्रमांक 30 मध्ये प्राथमिक शाळा क्रमांक एकच्या जागेची शैक्षणिक वापरासाठी मागणी केली आहे. हा भूखंड शाळेसाठी आरक्षीत असून, त्याचे 5037.00 चौरस मीटर इतके क्षेत्रफळ आहे. शैक्षणिक वापरासाठी हा भूखंड देण्याबाबत भूखंडाचे दर हे निवास दराच्या 50 टक्‍के प्रमाणे आकारण्यात यावेत, असा ठराव करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित भूखंडाच्या अधिमूल्यास सवलतीच्या दराने म्हणजे अधिमूल्याच्या 50 टक्‍के दराने 6 कोटी 17 लाख 53 हजार 620 रुपये इतके अधिमूल्य महापालिका प्रशासनाकडून जमा करण्यात येईल. त्यानंतर संबंधित जागेचा ताबा महापालिका प्रशासनाला घेता येणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव दि. 29 ऑगस्ट 2018 रोजी होणाऱ्या स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. तसेच, प्राधिकरणाकडे अधिमूल्य जमा करण्यासाठी आणि भाडेपट्टयापोटी येणाऱ्या खर्चास (उदा. मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, वकील फी, झेरॉक्‍स इ.) स्थायी समितीची मान्यता घेण्यात येणार आहे.

उर्दू शिक्षकांना 8 हजार रुपये मानधन
शहरातील उर्दू माध्यमांच्या सहा विद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2018-19 याकरिता मानधन तत्त्वावर नियुक्‍त केलेल्या 18 शिक्षकांना दरमहा 8 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव महापालिका शिक्षण समितीने स्थायी समिती सभेत ठेवला आहे. स्थायीच्या मान्यतेनंतर संबंधित शिक्षकांच्या मानधनाचा विषय मार्गी लागणार आहे.

शिक्षण दिनासाठी 5 लाखांचा खर्च
महापालिका शिक्षण विभागातर्फे दि. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शिक्षिकांना पुरस्कार दिला जातो. तसेच, आदर्श शाळा पुरस्काराने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांचाही गौरव केला जातो. या कार्यक्रमासाठी तसेच उपस्थित शिक्षकांना चहापान, निमंत्रण पत्रिका आणि पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी शिक्षक दिन लेखाशिर्षाखाली 5 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही स्थायीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

खाऊ वाटपावर 85 हजारांचा खर्च
महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने एकूण 18 माध्यमिक विद्यालये तसेच कासारवाडी व मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील एकूण 9 हजार 392 विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनी (दि. 15 ऑगस्ट) “ब्रिटानिया गुड-डे’ बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. त्यासाठी “ब्रिटानिया’च्या शहरातील अधिकृत विक्रेत्याशी करारनामा न करता सरळ पद्धतीने बिस्कीट खरेदी करण्यात आली. त्यासाठी प्रशासनाने प्रतिनग 9.09 रुपये दराने एकूण 85 हजार 373 रुपयांच्या खर्चास स्थायी समितीची मान्यता घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)