प्राणघातक हेड इंज्युअरी (भाग दोन)

मुख्य मेंदू हा मध्य मेंदूच्या वर, पुढे, मागे, बाजूला पसरलेला असतो. याचे डावा आणि उजवा असे दोन उपभाग पडतात. या दोन्ही भागांचं काम जरा वेगळं असतं. डावा भाग विचारशक्ती, बोलणं, भाषा, तंत्रज्ञान ही प्रगत कामं पार पाडतो. उजवा भाग संगीत, नृत्य, भावना, जाणिवा, आध्यात्मिक उर्मी आणि अवकाशज्ञान (म्हणजे आपल्या आजुबाजूला कोणती वस्तू कोठे आहे, याचं ज्ञान) इत्यादी जबाबदाऱ्या सांभाळतो. यातही मोठ्या मेंदूचा पुढचा कपाळातला भाग विचारशक्ती आणि सामाजिक भान सांभाळतो.

या भागाला इजा झाली तर विचारशक्ती दुबळी होते. मुख्य मेंदूचा मानेकडचा मागचा भाग हा दृष्टिज्ञानाशी(डोळे) संबंधित आहे. कानाकडचा भाग आवाज (ध्वनीविज्ञान) आणि वासाचं ज्ञान सांभाळतो. तर डोक्‍यावरचा मध्यभाग शरीराची हालचाल आणि संवेदना सांभाळतो. यावरून मेंदूचं शरीरातील स्थान किती महत्त्वाचं आहे, हे लक्षात येईल. हेड इंज्युरीचे अपघात घडल्यावर रुग्णाला नीट हाताळलं पाहिजे. योग्यवेळी योग्य उपचार केले नाहीत तर रुग्णाला कायमचं अपंगत्व येऊ शकतं.

 रुग्णाला नीट हाताळलंच पाहिजे

जास्तीत जास्त “हेड इंज्युरी’च्या घटना या दुचाकीवरच्या अपघातात घडतात. मग तो सायकलवरून होणारा अपघात असो की मोटारसायकलवरचा. हेड इंज्युरी झालेल्या रुग्णाला आमच्याकडे आणलं जातं, तेव्हा पेशंट पूर्ण शुद्धीवर आहे की, अधर्वट शुद्धीत, ते पाहिलं जातं.

शुद्धीत असलेला आणि बोलण्याच्या स्थितीत असलेल्या रुग्णाला अपघात कसा झालाय ते आठवतंय का, हे तपासून पाहतो. अर्थातच ही चाचणी त्याच्या स्मरणशक्तीची असते. त्यानंतर रुग्णाचं सीटी स्कॅन केलं जातं. सीटी स्कॅन चाचणीत अपघाती रुग्णाच्या मेंदूत रक्तस्राव झालाय की नाही याची चाचणी केली जाते. रक्तस्राव झाल्यास ते थांबवण्याचा प्रयत्न केला जातो.

अनेकदा हेड इंज्युरीच्या अपघातात, अपघाती रुग्णाची मान सावरली जात नाही. प्रत्यक्षात मान सावरणं गरजेचं असतं. मानेतून मज्जारज्जू गेलेला असतो. मज्जारज्जूच्या माध्यमातून हाता-पायांच्या हालचालींचं नियंत्रण केलं जातं. हेड इंज्युरीच्या अपघातात रुग्णाची मान न सावरल्यास त्याला अर्धागवायूचा  झटका येतो. नाही तर हातपाय अधू होतात. अशा अपघातांमध्ये रुग्णाचे दात तुटले आहेत का तेही पाहिलं जातं. कारण तुटलेल्या दातांचा तुकडा छातीत किंवा फुप्फुसात अडकू शकतो. अडकलेला तुकडा स्कोपी घालून काढावा लागतो.

अनेकदा एक ते दीड वर्षाची मुलं खेळता खेळता बिछान्यावरून खाली पडतात तेव्हा त्यांना इतकी दुखापत होत नाही, जितकी मोठयांना होते. कारण त्यांचा मेंदू हा खूपच लवचिक असतो. तो सुधारतो. मात्र, खेळताना पडून लहान मूल बेशुद्ध पडतं किंवा त्याचं डोकं दुखत असेल तर त्यांना सीटी स्कॅन करून बघावं लागतं. लहान मुलांमधल्या हेड इंज्युरीचं वेळीच निदान न झाल्यास त्यांना मोठेपणी आकडीचा (एपिलेप्सी) त्रास होतो. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीतही थोडंसं जागरूक असलं पाहिजे.

घसरून पडल्यावर होणाऱ्या हेड इंज्युरीजचं प्रमाण हे वृद्ध व्यक्तींमध्ये मोठं असतं. त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्यास अर्धागवायूचा झटका येतो. नाही तर कायमस्वरूपी स्मृतिभ्रंश होतो. महिला रुग्णाला हेड इंज्युरी झाल्यास त्यांच्या मासिक पाळीवर 90 ते 95 टक्के परिणाम होत नाही. मात्र हेड इंज्युरीमध्ये पिटयुटरी ग्रंथीला दुखापत झाल्यास मासिक पाळीवर परिणाम होतो.

डॉ. संजय क्षीरसागर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)