प्रशासन जोमात अन्‌ नागरिक कोमात

शिरूर तालुक्‍यात दुष्काळ निवारणासाठी कासवगती : शेतकरी हतबल

शिरूर- शिरूर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात दुष्काळसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरूर तालुक्‍याच्या अनेक भागांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. परंतु नेते प्रचारात मश्‍गूल तर प्रशासन उदासीन, अशी विदारक स्थिती तालुक्‍यात दिसत आहे. शिरूर तालुक्‍यात यंदाच्या वर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे नदी, नाले, ओढ्यांना समाधानकारक पाणी आले नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या अगोदरच नद्या कोरडेठाक पडले आहेत. पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. नाले, ओढेही वाहिले नसल्याने त्याचाही विहिरींना फायदा झालेला नाही. विहिरींच्या पाण्याची पातळी खालावल्याने अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहेत. यात चारा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न शिरूर तालुक्‍याच्या सर्व भागात निर्माण झालेला आहे.प्रशासनाने तालुक्‍याचा आढावा देताना चुकीची माहिती दिली असल्याने शिरूर तालुक्‍यात शासनाने मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. भीषण दुष्काळ असताना चुकीची माहिती दिली गेली आहे.

सध्या शिरूर तालुक्‍यात आतापर्यंत 21 टॅंकर पाणी वाटप करीत आहे. परंतु हे पाणी वाटप करताना मोठ्या प्रमाणात राजकीय नेते आपल्या पोळ्या शिजवताना दिसत असून आपल्या भागातील लोकांना पाणी कसे मिळेल, याकडे जास्त प्रमाणात लक्ष देत आहेत. टॅंकर चालकांवर दादागिरी केली जात आहे. अनेक वाड्या-वस्त्या जवळून पाणी जात असताना केवळ राजकारणामुळे हे पाणी मिळत नसल्याची अनेकांनी तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती येथे तक्रार केली आहे. परंतु याबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी हे महसूल व पंचायत समिती प्रशासन का जात नाही, असा संतप्त सवाल शेतकरी आणि नागरिकांतून उमटत आहे.

पाणीटंचाईच्या काळामध्ये शिरूर तालुक्‍यामध्ये चारा छावणी सुरू करणे गरजेचे होते. परंतु अद्यापही प्रशासनाला याबाबत जाग आली नाहरी. त्यामुळे दुष्काळात मूक जनावरे होरपळून निघत असताना चारा छावणी सुरू केली नाही. तालुक्‍यातील सर्व तलाव, बंधारे, मोठे ओढे कोरडेठाक पडले आहे. त्यांच्या खोलीकरणासाठी कोणतेही काम अद्याप शिरूर तालुक्‍यात सुरू नाही. ही दुष्काळनिवारणामधील गतीरोधक ठरला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात कूपनलिका आहेत. अनेक कूपनलिका नादुरुस्त असल्याचे दिसून येत आहे. यापुढील दोन महिन्यांमध्ये दुष्काळाचे प्रमाण तीव्र होणार असून पाण्याचे मोठे दुर्भिक्ष भासणार आहे. त्यासाठी ज्या विहिरींना पाणी आहे, अशा विहिरी अधिग्रहण करणे गरजेचे आहे. त्यासाठी कुठली कारवाई किंवा प्रस्ताव अद्याप प्रशासनाकडून झाला नाही. निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रशासन निवडणुकीच्या कामाला लागले आहे.

तालुक्‍यातील दुष्काळाबाबत मात्र, महसूल खात्याला कुठलेही सोयरसूतक नाही. यामुळे मात्र, चारा आणि पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या भागात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष आहे. पूर्व भागात मोठ्या प्रमाणात उसाचा पट्टा आहे. या भागातही वेळेत पाणी सोडले नाही. तसेच प्रशासनाकडून पाणी सोडण्याचे नियोजन नसल्याने उभी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत जळून जात आहेत. याबाबत महसूल, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे तिन्ही खाते गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळा जवळ आल्यानंतर तसेच नंतर या खात्याची पाणीटंचाई बैठक व दुष्काळ आढावा बैठक होईल, यात मोठी कामे घेतली जातील, हे सोपास्कर पार पडली जातील. कामे सुरू व्हायच्या आतच पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे आढावा बैठकीतील दिलेली कामे पावसाळ्यात चिंब होतील, यासाठी होणारा खर्च नक्‍की कोणाच्या खिशात जातो, हे गुलदस्त्याच राहात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.