प्रशासनाकडून अवैध वाहतुकीला खतपाणी?

आळंदी-चाकण बससेवा गेल्या 11 वर्षांपासून बंदच

आळंदी- पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर चाकण ही एक औद्योगिक केंद्र असून याठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून दळणवळणाचा मार्ग असल्याने प्रवासी वाहतूक सुरू असते. मात्र, आळंदीपासून अवघ्या 15 किलोमीटरवर असणाऱ्या चाकण शहरात आळंदीतून जाण्यासाठी एसटी (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) व पीएमपी (पुणे महानगर परिवहन महामंडळ) या दोन्ही सेवांची एकही सेवा सुरू नसल्याने प्रवाशांना नाईलाजस्तव अवैध वाहतुकीचा आधार घेत, वाहनांतून जीव धोक्‍यात घालून आजवर प्रवास करावा लागत असल्याने प्रशासन अवैध वाहतूकदारांना खतपाणी घालते आहे का? असा सवाल प्रवशांनी उपस्थित केला आहे.

अनेक वर्षांपूर्वी पुणे-आळंदी-चाकण अशी पीएमपीची बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळेस रस्ते अरुंद व खड्डेयुक्‍त असताना देखील मार्केट यार्ड-चाकण-आळंदी मार्गे 65 क्रमांकाची बससेवा सुरू होती. मात्र, 2008मध्ये चाकणच्या घाटात या बस सेवेला लुटारूंनी लुटून प्रवाशांना देखील मारहाण करण्यात आली होती, तेव्हापासून पीएमपी खात्याने या मार्गावरील बस सेवा पूर्णपणे बंद केली होती. आजतागायत ती सुरू न करण्यात आल्याने गेल्या 11 वर्षांपासून या मार्गावर प्रवास करणारे भाविक, नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तरी देखील या मार्गावर पुन्हा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेत नसल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

या ठिकाणचे रस्ते रुंदीकरण डांबरीकरण करण्यात आले असून देखील या मार्गावर बस सेवा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी आळंदी शहर प्रवासी संघ तसेच चाकण नागरी कृती समिती यांच्याकडून वारंवार केली जात आहे, तरी देखील यांच्या मागणीचा विचार आजतागायत केला गेला नाही. या मार्गावर पूर्ववत पीएमपी बससेवा सुरू करून ती आळंदी-चाकण व्हाया चिंबळी-केळगाव- मोशी अशा वर्तुळाकार मार्गाने दोन्ही बाजूने सुरू करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.