प्रभाग समिती सभेमुळे विकासकामांना गती – दिलीप यादव

परिंचे- जिल्हा परिषद प्रभाग गटांच्या सभेमुळे विकासकामांना गती मिळण्यास मदत होणार असून ग्रामसेवकांनी हलगर्जीपणा न करता आचारसंहितेपूर्वी विकासकामांच्या निविदा तसेच अपूर्ण कामे पूर्ण करावीत. ग्रामसेवकांनी विकासकामांचे जास्तीत जास्त प्रस्ताव द्यावेत म्हणजे मतदारसंघात मोठा निधी आणता येईल, असे प्रभाग समिती अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांनी सांगितले. परिंचे येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात वीर भिवडी गटाची प्रभाग सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कुंडलिक जगताप, पंचायत समितीच्या सभापती अर्चना जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्या नलिनी लोळे, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी वीर भिवडी मतदार संघातील संपूर्ण गावाच्या विविध अडचणी व विकासकामांबाबत विभागनिहाय आढावा घेण्यात आला. विविध ठिकाणच्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. समीर जाधव म्हणाले की, प्रभाग समितीच्या बैठकीतून अनेक गावांच्या योजनानिहाय कामाची माहिती मिळून गावांच्या अडचणी दूर होतात. तसेच अधिकारी व पदाधिकारी यांच्यात सुसंवाद वाढतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कुंजीर यांनी केले. तर समीर जाधव यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.