प्रदुषणमुक्‍तीचा संदेश: प्रकाश जावडेकर इलेक्‍ट्रीक कारमधून संसदेत दाखल

नवी दिल्ली : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या वर्षातले हे शेवटचे अधिवेशन आहे. दरम्यान, याअधिवेशनात अनेक मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यातच आज सकाळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे प्रदूषणमुक्‍तीचा संदेश देत इलेक्‍ट्रीक कारने संसदेच्या परिसरात दाखल झाले.

इलेक्‍ट्रीक कारमुळे प्रदूषण निर्मिती होत नाही. त्यामुळे सरकारचा हळूहळू इलेक्‍ट्रीक कारचा वापर वाढवण्यावर भर आहे,असे जावडेकर यांनी सांगितले. जनतेने जास्तीत जास्त सरकारी वाहने आणि इलेक्‍ट्रीक कारचा वापर करुन प्रदूषण विरोधी लढयात योगदान द्यावे असे आवाहन प्रकाश जावडेकर यांनी केले.

घसरललेले तापमान, वाऱ्यांचा मंदावलेला वेग व शेजारील राज्यात शेतांमध्ये भाताच्या पिकातील तुसाच्या स्वरूपातील अवशेष जाळण्यासाठी लावण्यात येणाऱ्या आगींच्या संख्येतील वाढ यामुळे दिल्लीतील प्रदूषणाची समस्या धोकादायक बनली आहे.

दिल्ली राजधानी परिसरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, पंजाब, हरयाणा व उत्तर प्रदेश या राज्यांच्या मुख्य सचिवांना उपस्थित राहण्यासाठी समन्स जारी केले होते. प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने सम-विषम वाहनांचाही प्रयोग केला.

Leave A Reply

Your email address will not be published.