प्रत्येक नागरीक हा पोलीस!

विश्वास नांगरे-पाटील ः पोलीस महानिरीक्षकांचा लोणावळेकरांसोबत संवाद

लोणावळा – प्रत्येक पोलीस हा गणवेशासह नागरीक असतो तर प्रत्येक नागरीक हा गणवेशरहित पोलीस असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि योग्य वेळी, योग्य प्रतिसाद दिला पाहिजे, असे प्रतिपादन कोल्हापूर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी लोणावळेकर नागरिकांसोबत संवाद साधताना केले.

पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी गुरुवारी लोणावळा शहर पोलिस ठाण्याला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी लोणावळेकर नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी बोलत असताना नांगरे-पाटील यांनी लोणावळेकर नागरिकांकडून पोलिसांना मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्‍त केला. तसेच लोणावळा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने लोणावळा सुरक्षित राहिले पाहिजे असे सांगतिले. याठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे असल्याने याठिकाणी राबविण्यात येणाऱ्या पोलिसिंगमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग, नियंत्रण आणि दबाव हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शहरात खाजगी आणि सरकारी सीसीटीव्हीचे जाळ उभारणे महत्त्वाचे असून ट्रॅफिकच्या मुद्‌द्‌यावर वेळेवर लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नांगरे-पाटील यांनी यावेळी व्यक्‍त केले.

लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी पोलिसांना वेगवेगळ्या आघाड्यांवर नेहमीच मदत करणाऱ्या शिवदुर्ग मित्र, लीगल एड फोरम, ज्येष्ठ नागरिक संघ यासारख्या संघटनांसह काही व्यक्‍तींचा नांगरे-पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक देविदास कडू, निखिल कवीश्वर, मावळ प्रबोधिनीचे रविंद्र भेगडे, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, आरपीआयचे शहराध्यक्ष कमलशील म्हस्के आदींसह मान्यवर आणि लोणावळेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपले कर्तव्य बजावण्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या शहर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील नांगरे-पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here