पौर्णिमेनिमित्त अमरापूरच्या रेणुका देवस्थानात भाविकांची गर्दी

तीन दिवस शतचंडी यागासह विविध धार्मिक कार्यक्रम
शेवगाव – अधिकमासातील पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र अमरापूरच्या रेणुका देवस्थानात आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांना असंख्य भाविकांनी हजेरी लावली.
गुजरातचे माजी मुख्य सचिव ए. आर. बॅनर्जी, न्यूझीलॅंडच्या जयेन एक्‍सपोर्ट कन्सल्टंटचे डायरेक्‍टर तथा ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट फॉर वॉटर सायन्सेसचे संचालक प्रा. अभिताभ मुखर्जी, तारकेश्‍वर गडाचे महंत आदिनाथ महराज शास्त्री, रेणुकामाता मंदिराचे विश्‍वस्त प्रशांत भालेराव आदी मान्यवरांचीही उपस्थिती होती.
या वेळी तीन दिवस शतचंडी याग करण्यात येऊन पौर्णिमेला त्याचे हवन करण्यात आले. या कार्यक्रमात ही मंडळी सक्रिय सहभागी झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारनंतर पाहुण्यांनी परिसरातील हंडाळवाडीच्या अनाथ मतिमंद मुलांच्या वसतिगृहास भेट देऊन येथील मुलांशी व उपस्थितांशी संवाद साधला. मुलांना त्यांच्या हस्ते टॉवेल, बिस्कीट व वडापाव देण्यात आला. त्यानंतर स्मार्ट व्हिलेज अमरापूर येथील ग्रामपंचायतीने राबविलेल्या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाची पाहणी केली. ही नावीन्यपूर्ण प्रशंसनीय कामे आहेत, अशा शब्दांत गौरव करत प्रा. मुखर्जी यांनी ग्रामस्थांना अनेक मौलिक सूचना केल्या.
ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी लोकसहभागातून गेल्या काही वर्षांत राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती माजी सरपंच विजय पोटफोडे, अरुण बोरुडे, बाळासाहेब चौधरी, हरिभाऊ चौधरी यांनी दिली. या वेळी ग्रामसेवक अण्णासाहेब नजन, रेणुकामाता मल्टिस्टेटचे जनरल मॅनेजर हरिश्‍चंद्र मोरे, ग्रामपंचायत सदस्य संजय म्हस्के, रमेश खैरे, महादेव खैरे, दिलीप अडसरे, अनिल बोरुडे, अश्‍वलिंग जगनाडे, राजेंद्र नागरे, अप्पा कुलकर्णी, सूरज आनंदकर, बबन गायकवाड, तुषार मुळे आदी उपस्थित होते.

“गाव एक परिवार’ संकल्पना राबवा…
प्रा. मुखर्जी यांनी गावातील उपलब्ध नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करून सौरऊर्जा प्रकल्प राबवावा, त्यामुळे गाव ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. गावातील प्रत्येकाचे आरोग्य सुदृढ व संपन्न रहावे यासाठी प्रत्येक कुटुंबाने गावरान व देशी गायीच्या वाणाचे जतन करावे. पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळावा, काळाची गरज ओळखून सेंद्रिय शेती व वनौषधींसाठी पार्कची उभारणी करण्याच्या सूचनेसोबतच गावाचा कारभार करताना “गाव एक परिवार’ ही भावना जपा, असे आवाहन प्रा. मुखर्जी यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)