सातारा, प्रशांत जाधव
जिल्हा पोलीस दलातील जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे पहिल्या टप्प्यातील ‘गॅझेट’ लवकरच फुटणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख तेजस्वी सातपुते यांनी १६७ पोलीस कर्मचार्यांना गुरुवार दि. ३० रोजी सकाळी साडे आठ वाजता पाचारण केले आहे. या पहिल्या टप्प्यातील गॅझेटमध्ये प्रशासकीय कारणास्तव १६७ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत.
मे महिन्यात प्रत्येकवर्षी पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस फौजदार यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गॅझेटला वेळ लागला. पोलीस ठाण्यात सहा वर्षे व तालुक्यात बारा वर्षे सेवा बजावलेल्या १६७ कर्मचार्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत.
त्यानंतर दुसर्या टप्प्यात विनंती व प्रशासकीय कारणास्तव बदल्यांचे ‘गॅझेट’ फोडण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रशासकीय कारणास्तव बदलीमध्ये सहाय्यक पोलीस फौजदार २५, हवालदार ४९ , नाईक ४७ आणि ४६ पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.