पोलीस आयुक्‍तालयास शाळा दिल्यास आंदोलन

पिंपरी- चिंचवडगाव येथील शाळेची इमारत अपुरी पडत असल्याने पालकांनी केलेल्या आंदोलनानंतर महात्मा फुले शाळेस स्वतंत्र इमारत मिळाली होती. ही जागा पोलीस आयुक्‍तालयास देण्याचा घाट घातला जात आहे. तसे झाल्यास पुन्हा आंदोलन करू, असा इशारा येथील पालकांनी महापालिका प्रशासनास निवेदनाद्वारे दिला आहे.

महात्मा जोतिबा फुले इंग्रजी माध्यम शाळा पूर्वी चिंचवडगावातील पडवळ आळीत होती. पाच वर्ग खोल्या, एक हॉल होता. त्यात बालवाडीचे चार वर्ग आणि पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गात 550 विद्यार्थी शिक्षण घेत होते. ही जागा अपुरी पडत असल्याने शाळेसाठी स्वतंत्र इमारत द्यावी, या मागणीसाठी पालकांनी 25 एप्रिल 2014 रोजी चिंचवडगावात चक्काजाम आंदोलन केले. त्याची दखल महापालिकेच्या प्रशासनाने घेतली. आणि 1 सप्टेंबर 2014 पासून प्रेमलोक पार्क येथील इमारतीमध्ये 14 वर्ग खोल्या शाळेला दिल्या.

या शाळेला जानकीदेवी बजाज संस्थेकडून संगणक, ई-लर्निंग, लायब्ररी, सायन्स रूम, आदी सुविधा मिळाल्या. या शाळेला 11 शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असणे गरजेचे आहे. मात्र केवळ चार शिक्षकच महापालिकेने दिले आहेत. खासगी संस्थेने दोन शिक्षक उपलब्ध करून दिले आहेत. या शाळेच्या इमारतीमध्ये आल्यापासून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेतही फऱक पडला आहे. तरी सुद्धा ही शाळा स्थलांतरीत करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही पालकांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)