पोलिसांवर दगडफेक करून दत्ता पळाला

सांगली- सातारा येथील मोक्का गुन्ह्यातील आरोपी दत्ता जाधव याला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍यातील प्रतापपूर येथे पकडायला गेलेल्या पोलिसांवरच दगडफेक करण्याचा प्रकार घडला. सातारा आणि सांगली पोलीसांवर ग्रामस्थांनी जोरदार दगडफेक केली. या सर्व गोंधळाचा फायदा घेऊन जाधव पळून जाण्यात यशस्वी ठरला. मात्र, त्याच्या भावासह सहा जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दगडफेकीत महिला पोलीस कर्मचारी वहिदा मुजावर, पी. बी. खाडे, सपना निकम, जे. एम. राणे, ए. ए. शिंदे (सर्व जत) व वैभव सावंत (सातारा) हे जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी 20 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. खली उर्फ कृष्णा बेडेकर, अमर भांडे, शिवाजी पवार, अमोल मुणेकर, सोमनाथ मोटे (सर्व रा. प्रतापसिंहनगर झोपडपट्टी, सातारा) यांना अटक केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळलेली माहिती अशी की, सातारा येथील प्रतापसिंहनगर परिसरात झोपडपट्टीदादांच्या टोळीने सातारा जिल्ह्यात दहशत माजविली आहे. या टोळीवर पंधराहून अधिक गुन्हे दाखल आहेत. टोळीचा म्होरक्‍या दत्तात्रय रामचंद्र जाधव आणि त्याच्या साथीदारावर मोका लावण्यात आला आहे. जाधव हा फरारी आहे. तो साथीदारासह प्रतापपूर येथे पीरबाबाच्या उरसाला येणार असल्याची खबर सातारा पोलिसांना मिळाली होती. प्रशिक्षणार्थी अधिक्षक पवन बनसोडे व त्याच्या पथकातील कर्मचारी त्याला अटक करण्यासाठी आले.

यावेळी मदतीसाठी जतचे उपविभागीय अधिकारी नागनाथ वाकुडे व त्याचे कर्मचारी गेले. त्यावेळी तमाशा सुरु होता. पोलिसांनी जाधवला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस आल्याचे समजताच जाधव पळून जाऊ लागला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी धाव घेताच त्याचा भाऊ युवराज जाधव, भेजा जाधव यांच्यासह पंधरा ते वीस साथीदार आडवे आले. त्यांची पोलिसांशी झटापट झाली.

युवराजने व्यासपीठावर जाऊन माईकचा ताबा घेतला. पोलीस आलेत त्यांना मारा, सोडू नका असा आवाज दिला. त्यामुळेच एकच गोंधळ उडाला. काही तमाशा शौकीन पळाले. काही महिलांनी पोलिसांवर हल्ला केला. महिला पोलीस महिलांना ताब्यात घ्यायला पुढे गेल्या. त्यावेळी युवराज जाधव आणि त्याच्या साथीदारांनी महिला पोलिसांचा गळा आवळून मारण्याचा प्रयन्त केला.

प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी लाठीमार सुरु केल्याने गर्दी पांगली. गोंधळाचा फायदा घेऊन गुंड जाधव पळून गेला. मात्र, पोलिसांनी युवराज व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांना गाडीत घालून घेऊन जात असताना महिलांनी दगडफेक केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
26 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)