पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी प्रणित निखिल भगत यांची बिनविरोध निवड निश्‍चित

  • आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भगत यांचा ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रभाग क्र. एक “ब’ मधील पोटनिवडणुकीच्या राजकारणाला शुक्रवारी (दि. 17) शेवटच्या टप्प्यात नाट्यपूर्ण कलाटणी मिळाली. भाजपचे युवा कार्यकर्ते निखिल भगत व स्वप्नीता भगत यांनी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडी प्रणित जनसेवा विकास समिती आणि शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. भगत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित मानली जात आहे.

भाजपचे नगरसेवक व आमदार सुनील शेळके यांचे चुलतबंधू संदीप शेळके यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायचा आजचा शेवटचा दिवस होता. स्वतःच्या घरातील तसेच पक्षातील इच्छुक उमेदवारांची समजूत घालून आमदार शेळके यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. आमदार शेळके व किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या “तयार’ उमेदवाराचा पक्ष प्रवेश घडवून त्याला ऐनवेळी उमेदवारी दिल्याने भाजपची गोची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आमदार सुनील शेळके तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे तसेच किशोर आवारे, गणेश खांडगे, गणेश काकडे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे आदींच्या प्रयत्नांतून निखिल भगत यांची जनसेवा विकास समिती आणि शहर सुधारणा व विकास समितीची उमेदवारी निश्‍चित झाली.

नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप व जनसेवा विकास आघाडी यांची युती होती, मात्र राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणानुसार तळेगाव नगर परिषदेत जनसेवा विकास समिती आणि शहर सुृधारणा व विकास समिती एकत्र आली आहे. त्यामुळे नगर परिषदेतील भाजपचे बहुमत संपुष्टात आले आहे. नगर परिषदेतील सत्ता टिकवण्यासाठी भाजपला ही पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे होते, मात्र उमेदवार देता न आल्याने ती संधी भाजपने गमावल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.