पोंदेवाडीत बिबट्याचा पिंजऱ्याला चकवा

  • आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागात बिबट्याची दहशत कायम

मंचर – आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील पोदेंवाडी येथे बिबट्‌याला अडकवण्यासाठी वनखात्याचे कर्मचारी आणि शेतकरी पिंजरा लावत असताना शेजारील उसाच्या शेतात वाघाने धूम ठोकली. हा प्रकार मंगळवारी (दि. 24) सायंकाळी घडला. पोंदेवाडी येथील खारावस्ती परिसरात बिबट्‌याचा वावर वाढला आहे. मेंढपाळांच्या मेंढ्‌या बिबट्‌याने पळवून नेण्याचे प्रकार घडले आहेत. उसाच्या शेतात बिबट्‌याचे वास्तव्य असल्याचे शेतकरी महेश बबनराव वाळूंज यांनी सांगितले, त्यामुळे पाणी भरण्यासाठी शेतकरी जात नाही. शेतीकामे वाघाच्या भीतीने रेंगाळल्याची माहिती माजी सरपंच बबनराव वाळुंज यांनी दिली. पोंदेवाडी गावातील जुना रोडेझाप-सटवाजीबाबा मंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी शेतकरी, वनखात्याचे कर्मचारी पिंजरा गाडीतून उतरवत असताना बिबट्‌या त्यांच्याजवळून चपळाईने जात उसाच्या शेतात गेल्याचे त्यांना दिसले, त्यामुळे ही घटना समक्ष पाहणारे सर्वजण हादरून गेले. रात्री पिंजऱ्यामध्ये वाघाला भक्ष्य म्हणुन बकरू ठेवले होते.बकरू हे भक्ष्य दिसल्याने बिबटया वाघ पिंजऱ्यात आला. परंतु पिंजऱ्याची झडप बंद झाली नसल्याने बिबट्‌या तेथून निघून गेल्याच्या पाऊलखुणा दिसुन आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वनखात्याने येथे पिंजरा लावून भीती कमी होण्यास मदत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

  • निरगुडसर येथे दोन शेळ्या केल्या ठार
    आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील निरगुडसर येथे बिबट्याने दोन शेळया ठार केल्याची घटना बुधवारी (दि. 25) पहाटे घडली. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. निरगुडसर-बेटवस्ती येथे ज्ञानेश्‍वर मारुती टाव्हरे यांचा गायींचा गोठा आहे. तेथे दोन शेळ्या होत्या. सकाळी ज्ञानेश्‍वर टाव्हरे दूध काढण्यासाठी गेले असता एक शेळी मृत असल्याचे दिसून आले, तर दुसरी शेळी सुरेश टाव्हरे यांच्या शेतात फरफटत नेल्याच्या खुणा आहेत. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. उपसरपंच दादाभाऊ टाव्हरे,सुरेश टाव्हरे यांनी घटनास्थळी भेट देऊन वनखात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)