पैशासाठी युवकाचे अपहरण करणाऱ्यांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; एका महिलेसह तिघांचा समावेश

सातारा, दि. 14 (प्रतिनिधी) –

मंगळवार पेठेतील विशाल यशवंत पिलावरे या युवकाच्या अपहरणाचा छडा लावत शाहूपुरी पोलिसांनी नवी मुंबईतील दिघा गाव परिसरातील एका महिलेसह चौघांना अटक केली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कृष्णा प्रभुनाथ ठाकूर (वय 28), संजय अशोक शर्मा (वय 36), नितीन बाळासाहेब जगताप (वय 31), महादेव लक्ष्मण गडदे (वय 34) आणि महानंदा रामवृक्ष विश्‍वकर्मा (सर्व रा. महात्मा फुलेनगर, दिघा गाव, नवी मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबात स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेली माहिती अशी, एका महिलेसह 7-8 जणांनी विशाल पिलावरे यांचे दि. 9 रोजी अपहरण करून दोन लाखांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास मारून टाकण्याची धमकी अपहरकर्ते देत होते. याबाबत त्यांच्या पत्नी मेघा पिलावरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील तक्रार दिली होती.

सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शाहूपुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने या गंभीर गुन्ह्याचा छडा लावला.

या पथकाने नवी मुंबईतील अपहरकर्त्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. त्यांना सातारा येथील न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. हा प्रकार आर्थिक व्यवहारातून घडला असल्याचे समोर आले आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस नाईक योगेश पोळ, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रवीण कडव, मयूर देशमुख, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे ओंकार यादव, मोहन पवार, वैशाली गुरव यांनी ही कारवाई केली.

शाहूपुरीच्या पाटलांना श्रेय घेण्याची घाई?
अपहरणाचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शाहूपुरीच्या दोन कर्मचाऱ्यांनी मुंबईतून संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर याबाबत शनिवारी वरिष्ठांच्या आदेशाने प्रेस नोट देण्याची सूचना समीर शेख यांनी दिली होती. मात्र, शाहूपुरी पोलिसांनी त्या आदेशाचे पालन न करताच माध्यमांना माहिती दिली. त्यावरच न थांबता या कारवाईत स्वत:चीच पाठ थोपटून घेतल्याने शाहूपुरीच्या पाटलांना श्रेय घेण्याची घाई झाल्याची चर्चा पोलीस दलात होती.

Leave A Reply

Your email address will not be published.