परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपींना शिक्षा
श्रीरामपूर – मित्राचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करत खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तिघांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे एकही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ही शिक्षा सुनावण्यात आली.
अधिक माहिती अशी, गणेश गोरक्षनाथ चांदगुडे (रा. चासनळी, ता. कोपरगाव) हा मामा सुनील सीताराम दौंड (रा. मातापूर, ता. श्रीरामपूर) यांच्याकडे राहण्यासाठी आला होता. येथील बोरावके महाविद्यालयात तो बारावीचे शिक्षण घेत होता. 12 मार्च 2015 रोजी त्याचे मित्र अजय दिनकर मोरे, पराग मच्छिंद्र पटारे व धीरज शंकर शिंदे या तिघांनी त्याला पळवून नेले. त्यानंतर त्याच्या आईच्या मोबाइलवर मॅसेज व संपर्क साधून एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली होती. मात्र, आरोपींनी गणेशचा दगडाने ठेचून खून केला व मृतदेहावर रॉकेल टाकून पेटवून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, 12 मार्च 2015 रोजी गणेश याने मित्र पराग याच्या घरी सीईटीचा अभ्यास करण्यासाठी जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, तो पुन्हा घरी परतलाच नाही. त्याच्या मोबाइलवरून त्याच्या आईच्या मोबाइलवर खंडणीची मागणी करण्यात आली होती. यानंतर आरोपींनी त्यास नेवासा फाटा येथे दारू पाजून नगर – औरंगाबाद रस्त्याने गंगापूर हद्दीमध्ये नेले. येथे त्याच्या डोक्यात दगड टाकून पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणी तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकाऱ्यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण 26 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये सुनील दौंड, संतोष गायधने, संदीप आठरे, रमेश उंडे, सुभाष झिने, पूनम लवांडे, मीनाक्षी चांदगुडे, ज्योती दौंड, भागीरथीबाई थोरात, साधना मांडे, सागर पवार, राजू यादव, शुभम लोखंडे, पोलीस हवालदार सोन्याबापू नाणेकर, शाबीर शेख, लक्ष्मण पठाडे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, तुषार पारखे, मुख्य हवालदार अशोक सातपुते, पोलीस निरीक्षक नितीन पगार, नोडल ऑफिसर सचिन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने, उपनिरीक्षक शिवाजी पाळंदे, फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे अरुण गायकवाड आदींच्या साक्ष महत्त्वाच्या ठरल्या.
या गुन्ह्यात अजय दिनकर मोरे, पराग मच्छिंद्र पटारे व धीरज शंकर शिंदे या तिघा आरोपींना प्रत्येकी पाच हजारांचा दंड, जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा, सहा महिने शिक्षा व 500 रुपये दंड, तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिने शिक्षा, तीन वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी, तीन वर्षे शिक्षा व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा आरोपींनी एकाच वेळी भोगायच्या आहेत. दंडाच्या रकमेपैकी 10 हजार रुपये मयताची आई मीनाक्षी चांदगुडे यांना देण्यात येणार आहेत.
या खटल्याचे काम पाहण्यासाठी फिर्यादी सुनील दौंड यांच्या अर्जावरून जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी ऍड. भानुदास तांबे यांची नेमणूक केली होती. त्यांना ऍड. प्रसन्न गटणे यांनी सहकार्य केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा