पैशांच्या उधारीवरून कोंढव्यात युवकाचा खून

पुणे- उसने दिलेले पैसे देत नसल्याचे रागातून चौघांनी तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार व डोक्‍यात दगड घालून युवकाचा खून केला. ही घटना कोंढव्यात शिवनेरी परिसरात मंगळवारी रात्री घडली.

शाहरूख उर्फ खड्या नुरहसन खान (19, गल्ली नं. 9) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आकाश मल्होत्रा (19) यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुन्या उर्फ महेश मिसाळ व त्याचे दोन ते तीन साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहरूख खान हा पेंटिंग तसेच इतर कामे करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. शाहरूख खान हा सुन्या उर्फ महेशकडे सतत दारू तसेच खर्चासाठी पैसे मागत होता. त्याला महेशने यापूर्वी पैसे दिले होते. हे पैसे महेश गरज असल्याने परत मागत होता. मात्र, शाहरूख हा पैसे परत करत नव्हता. याचा राग आरोपींच्या मनात होता. दरम्यान, शाहरूख फिर्यादी व त्यांचे इतर दोन मित्र मंगळवारी रात्री शिवनेरीनगर येथील नवीन पाण्याचे टाकीजवळील मैदानावर गप्पा मारत बसले होते. यावेळी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महेश व त्याचे साथीदार तेथे आले. त्यांनी पैसे देत नसल्याचे कारणावरून खान याचेवर शस्त्राने वार केले. यानंतर त्याचे डोक्‍यात सिमेंटचा गट्टू व दगड घालून त्याचा खून केला. हा वाद सुरू झाल्यानंतर त्याचे मित्रही भीतीपोटी पळाले होते. दरम्यान, एक तरूण रक्ताचे थारोळ्यात पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार, कोंढवा पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी माहिती घेतली असता तो शाहरूख खान असल्याचे समजले. तपास केल्यानंतर सुन्या उर्फ महेश मिसाळ व त्याचे साथीदारांनी खून केल्याची माहिती मिळाली.

Leave A Reply

Your email address will not be published.